US Airstrikes Iran : इस्रायल आण इराणमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दोन्ही देशांकडून जोरदार हवाई हल्ले सुरु आहेत. या दोन्ही देशातील संघर्षात अमेरिकेनेही एन्ट्री केल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेने इराणवर २२ जून रोजी मोठे हवाई हल्ले केले. या हल्ल्यात इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे आता इस्रायल आण इराणमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पण अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले करताना नेमकं कशाचा वापर केला? अमेरिकेने या हल्ल्यासाठी काही खास रणनीती वापरली का? अमेरिकेच्या हवाई हल्ल्याची इराणला साधी भणकही का लागली नाही? जर इराणला अमेरिकेच्या हवाई हल्ल्याची कल्पना होती तर मग इराणने अमेरिकेच्या हवाई हल्ल्यादरम्यान प्रत्युत्तर का दिलं नाही? असे अनेक सवाल आता उपस्थित केले आहेत. मात्र, अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी एक खास रणनीती आखली होती आणि त्यामुळे या हल्ल्याची इराणला भणक लागली नसल्याचं बोललं जात आहे.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याला ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असं नाव दिलं आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून बी-२ बॉम्बर्सचा एक गट मिसूरी येथील हवाई तळावरून उड्डाण करत ग्वाम बेटाकडे जाताना दिसला. मात्र, तज्ञांच्या मते इराणवर हल्ला करण्याआधी विमानांचा एक गट हा पूर्व नियोजित तिकडे जाणार होता. मात्र, हीच रणनीती होती असं बोललं जात आहे. कारण त्याच वेळी सात बी-२ बॉम्बर्स जेटच्या दुसऱ्या एका गटाने इराणमध्ये जाऊन ३ अणुकेंद्रावर हवाई हल्ले केले. इराणच्या तीन मुख्य अणुकेंद्रावर केलेला हल्ला हा बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा स्ट्राईक होता. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ कंस पार पडलं?
अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यांना ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असं सांकेतिक नाव देण्यात आलं होतं. या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’च्या माध्यमातून इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये १२५ हून अधिक विमाने, ७ बी-२ बॉम्बर्स, १३ हजार किलो वजनाचे डझनभर बॉम्बचा समावेश होता. तसेच इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ला करण्यासाठी एकूण २५ मिनिट लागल्याची माहिती चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी दिली आहे.
हल्ल्यादरम्यान इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं का?
अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रावर हल्ल्याचं ऑपरेशन २५ मिनिटांत पूर्ण झालं. तसेच या संपूर्ण २५ मिनिटांच्या ऑपरेशन दरम्यान इराणी हवाई संरक्षण प्रणालींनी कोणत्याही अमेरिकन लष्करी मालमत्तेवर हल्ला केला नसल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. बॉम्बर्सनी संध्याकाळी ६.४० वाजता फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या ठिकाणी हल्ला केला आणि त्यानंतर ७.०५ वाजता इराणी हवाई हद्दीबाहेर गेले. दरम्यान, इराणवर हवाई हल्ला करण्याआधी अमेरिकेच्या या विमानांनी अमेरिकेती मिसूरी येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं,अशी माहिती डॅन केन यांनी दिली.
३७ तास नॉनस्टॉप उड्डाण अन् इंधनही हवेतच भरलं
अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या बी २ बॉम्बरचा वापर केला. इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी तब्बल ३७ तास नॉनस्टॉप उड्डाण केलं, एवढंच नाही तर इंधन देखील हवेतच भरलं आणि त्यानंतर अमेरिकेच्या बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला.