Israel Iran Conflict Operation Rising Lion: गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व इराण संघर्ष पेटला असून दिवसेंदिवस तो चिघळत चालला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सातत्याने हवाई हल्ले चालू ठेवले आहेत. अमेरिकेकडून या परिस्थितीसाठी इराणलाच जबाबदार ठरवण्यात आलं असून जी-७ देशांनीही इस्रायलला संघर्षात पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे दोन्ही देशांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक व्यापक स्वरूप घेत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टनला परतले!
जी-७ परिषदेसाठी निघालेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अचानक वेळेआधीच वॉशिंग्टनला परतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. इस्रायल-इराण संघर्षावर जी-७ परिषदेत चर्चा होणं अपेक्षित असताना डोनाल्ड ट्रम्प अचानक वॉशिंग्टनला का चालले असावेत? यावर तर्क-वितर्क चालू झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना लक्ष्य करताना ट्रम्प यांनी आपण इराण-इस्रायल संघर्षातील मुद्द्यांवर काम करण्यासाठी वॉशिंग्टनला जात नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. पण आता त्यांच्या शासकीय एअर फोर्स वन विमानावर ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधताना या संघर्षाबाबत भाष्य केलं आहे.
इस्रायल-इराण संघर्षावर काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षाबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता फक्त शस्त्रसंधी आपल्याला अपेक्षित नसल्याचं स्पष्ट केलं. “आम्हाला या संघर्षात फक्त शस्त्रसंधीपेक्षा अधिक चांगला शेवट हवा आहे”, असं ट्रम्प म्हणाले. अधिक चांगला शेवट म्हणजे काय? अशी विचारणा केली असता “याचा अर्थ संघर्षावर पूर्णविराम. एक खराखुरा शेवट. फक्त तात्पुरती शस्त्रसंधी नको. संपूर्ण शेवट”, असं ट्रम्प म्हणाल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे.
अमेरिका इस्रायलच्या पाठिशी
दरम्यान, आपल्या स्पष्टीकरणातून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका इस्रायलच्या पाठिशी असल्याचंही सूचित केलं. “आम्ही इस्रायलच्या पाठिशी आहोत. या संघर्षावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चेत चांगली प्रगती होत आहे. लक्षात घ्या, इराण अण्वस्त्र बाळगू शकत नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
याशिवाय, ट्रम्प यांनी यावेळी अमेरिकेतून काही उच्चपदस्थ व्यक्तींना मध्य-पूर्व आशियात पाठवून इराणला चर्चेतून तोडग्यासाठी राजी करण्यासंदर्बात बोलणी करण्यासाठी पाठवण्याचे संकेत दिले. यात उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स किंवा मध्य-पूर्व आशियातील अमेरिकेचे प्रतिनिधी एन्वॉय स्टीव्ह विटकॉफ यांचाही समावेश असू शकतो. दोन्ही देश आत्तापर्यंत आक्रमक दिसत असून येत्या दोन दिवसांत चित्र बदलेल, असंही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं.