Israel Iran conflict Indian ship attacked: युद्धविराम सुरु असताना इस्रायल-इराणमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. हा संघर्ष सुरु असतानाच २४ भारतीय खलाशी असणाऱ्या तेल जहाजाला अचानक आग लागल्याने खळबळ निर्माण झाली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ओमान समुद्रकिनाऱ्याजवळ ही घटना घडली. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सर्व खलाशी सुखरुप आहेत.
फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाची माहिती
फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, ओमानच्या किनाऱ्याजवळ तेलवाहू मारीवेक्स जहाजावर २४ भारतीय खलाशी अडकून पडले. जहाजावर आग लागल्यानंतर युनियनकडून भारतीय प्रशासन आणि भारतीय नौदलाकडे मदत मागण्यात आली. या जहाजावरील या घटनेची अधिक माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलेली नाही. शिवाय जहाजातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची देखील अधिक माहिती समोर आलेली नाही.
जहाजबांधणी मंत्रालयाचे स्पष्टीकरण
जहाजबांधणी मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, जहाजावरील आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण त्याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, टँकरमध्ये कोणताही माल नव्हता. घटनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी जहाजबांधणी मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि जहाजाच्या मालकाच्या संपर्कात आहे. दरम्यान, मारीवेक्स कारवार येथून ओमानच्या दिशेने निघाले होते अशी माहिती समोर आली आहे.
इस्रायल- इराण संघर्ष तीव्र
दरम्यान, रविवारी इराणने इस्रायलच्या काही भागांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. यानंतर इस्रायलने देखील प्रतिहल्ला केला. इस्रायली सैन्याने इराणच्या महशहर शहरातील करुण पेट्रोकेमिकल कंपनीवर हल्ला केला आहे. या प्लांटच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. इराणने इस्रायली हवाई तळांना लक्ष्य केले. तर, इस्रायलवर हौथींकडूनही हल्ला करण्यात आला. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने देखील मध्य आणि पश्चिम इराणवर हल्ले केले.
ट्रम्प यांचे आवाहन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टद्वारे इराण आणि इस्रायला “गोळीबार” थांबवण्याचे आवाहन केले. “इस्रायल आणि इराणने तात्काळ गोळीबार थांबवला पाहिजे,” असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. इराण आणि इस्रायल संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. तीन महिन्यांपासून सुरु असणाऱ्या संघर्षामुळे अगोदरच इंधन, गॅस तुटवड्याचा सामना करत असणाऱ्या नागिकांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे.
