Israel-iran conflict : इस्त्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये प्रादेशिक तणाव कमालीचा वाढला आहे. यादरम्यान इस्त्रायले पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. इतकेच नाही तर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्त्रायलच्या हवाई दलाने तेहरानच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे.
तसेच आज सकाळी इस्रायलच्या लष्कराने इराणच्या राजधानीवर एरियल सुपीरियरिटी म्हणजेट हवाई वर्चस्व मिळवल्याचा दावा केला होता.
इस्त्रायलच्या लष्कराने सांगितले की, त्यांनी इराणच्या हवाई सुरक्षा आणि क्षेपणास्त्र प्रणालीचे इतके नुकसान केले की आता त्यांची विमाने कोणत्याही मोठ्या धोक्याशिवाय तेहरानवरून उड्डाणने करू शकतात.
तर दुसरीकडे इराणमध्ये आतमध्ये घुसून इस्त्रायलने लक्ष्यांवर हल्ले केल्यानंतर इराणने देखील इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यानंतर इस्त्रायलमध्ये संघर्षाच्या चौथ्या दिवशी मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने एका एक्स पोस्टमध्ये असा दावा केला आहे की, त्यांनी शस्त्रे वाहून नेणारे अनेक ट्रक ज्यामध्ये जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र लाँचर्सचाही समावेश होता, त्यांना शोधून काढले. हे सर्व ट्रक इस्रायली हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पश्चिम इराणमधून तेहरानकडे जात होते परंतु त्यांच्या (इस्त्रायलच्या) लष्कराने त्यांना यशस्वीरित्या लक्ष्य केले आणि त्यांना निष्क्रिय केले.
इराण आणि इस्त्रायल संघर्ष
अनेक दशकांच्या शत्रुत्वानंतर इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. इस्त्रायले शुक्रवारी अचानक इराणमध्ये अनेक ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्यांनी दावा केला ही त्यांच्या शत्रूला अण्वस्त्रे मिळू नयेत म्हणून आम्ही हा हल्ला केला. मात्र हे आरोप इराणने फेटाळले आहेत.
इराणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान २२४ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात वरिष्ठ लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा देखील समावेश आहे.
तर याला प्रत्युत्तर देत इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड यांनी आपण इस्त्रायलमध्ये क्षेपणास्त्रे डागून यशस्वीरित्या हल्ला केल्याचे म्हटले आहे.
सोमवारी इस्रायलमध्ये एकूण मृतांची संख्या ११ ने वाढल्याचे त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे, यामुळे शुक्रवारपासून इस्त्रायलमधील मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे.