Israel Iran Conflict Updates : इस्त्रायल आणि इराणमध्ये जवळपास एका आठवड्यापासून जरोदार संघर्ष सुरू आहे. इस्त्रायलकडून सातत्याने इराणच्या तेहरान या शहरात विविध भागांवर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्त्रायलने इराणच्या तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालय आणि गॅस रिफायनरीसह तेल डेपोंवर हवाई हल्ले केले आहेत. इराणनही इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत आहे, त्यामुळे दोन्ही देशांत चांगलाच संघर्ष पेटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष कमी करण्यासाठी जी-७ परिषदेतील नेत्यांनी तयार केलेल्या एका संयुक्त निवेदनाच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही इराणला अण्वस्त्रासंबंधित करारावर स्वाक्षरी करण्यावरून सूचक इशारा देखील दिला होता. दरम्यान, इस्रायलला स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकार असून इराणला अण्वस्त्रे मिळणार नाहीत याची निश्चिती करण्यासाठी काम करतील अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे.
दरम्यान, इराण अण्वस्रनिर्मितीपासून काही महिने नाही, तर तब्बल ३ वर्षे दूर असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर खात्याने केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. अमेरिकी गुप्तचर खात्याला असं आढळून आलं आहे की इराण अण्वस्त्र तयार करण्यास सक्षम होण्यापासून आणखी तीन वर्षांपर्यंत दूर आहे. इस्रायलने केलेल्या दाव्यालाही अमेरिकी गुप्तचर खात्याने उत्तर दिलं आहे.
खरं तर इस्रायलने इराणवर हल्ला सुरू केल्याच्या कारणामागे हेच एकमेव कारण होतं की अण्वस्राच्या परिणामापासून बचाव करणं महत्वाचं आहे. इस्रायलचा दावा आणि अण्वस्त्र कार्यक्रमाच्या व्याप्तीचे विश्लेषण करताना अमेरिकी गुप्तचर खात्याने हा फरक उघड केला. या पार्श्वभूमीवरच इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला नष्ट करण्यासाठी अमेरिकेने आतापर्यंत इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ या लष्करी कारवाईत थेट सहभाग घेतला नाही यांच हे एक कारण असू शकतं. नुकतंच ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की अमेरिका इराणच्या अणु पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या इस्रायलच्या कारवाईत सहभागी होऊ इच्छित नाही. तसेच इराणने खूप उशीर होण्यापूर्वी इराणच्या अणु कार्यक्रमासंदर्भात करार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं.
‘इराण अण्वस्त्रे तयार करत नाही’
राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मार्चमध्ये सांगितलं होतं की, इराण सध्या सक्रियपणे अण्वस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करत नाही. इराण अण्वस्त्रे तयार करत नाही आणि सर्वोच्च नेते खमानेई यांनी २००३ मध्ये स्थगित केलेल्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र, तरीही याबाबत गुप्तचर विभागाचं मूल्यांकन सुरू आहे”, असं तुलसी गॅबार्ड यांनी म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.