Israel Iran Nuclear War intent and Donald Trump’s Diplomatic Challenges: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेले युद्ध एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन ठेपले आहे. इराणला आपण चुटकीसरशी गुडघ्यावर आणू, असा नेतान्याहू आणि ट्रम्प यांचा कयास होता. मात्र इराणने दोन्ही देशांना अतिशय कडवी टक्कर दिली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा युद्धाच्या पहिल्याच दिवशी मृत्यू झाला. त्यानंतरही अनेक इराणी अधिकारी युद्धात मारले गेले असले तरी इराण झुकलेला नाही. आता इस्रायल इराणवर अणुबॉम्ब टाकू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

अमेरिकेतील मुक्त पत्रकार मेगन केली यांनी नुकतीच शिकागो विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रॉबर्ट पेप यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या सद्यस्थितीचा आणि मध्यपूर्वेतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच मध्यपूर्वेतील युद्धात अणुबॉम्बचा प्रयोग होऊ शकतो का? असा प्रश्न मेगन केली यांनी विचारला. त्यावर प्राध्यापक पेप यांनी उत्तर दिले.

इस्रायल पहिला अणुबॉम्ब टाकेल?

मेगन केली यांनी मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांना आता युद्धातून बाहेर पडायचे आहे आणि युद्धाचे खापर इस्रायलवर फोडायचे आहे. अमेरिका जर या युद्धातून बाहेर पडली तर इस्रायलवरील धोका वाढू शकतो. कारण रमजानच्या महिन्यात खामेनीची हत्या करण्यात आली. इराणचे ५० हून अधिक अधिकारी मारले गेल्यानंतर इस्रायलविरोधात फतवा काढला गेला होता. तसेच इराणकडे अजूनही युरेनियमचा थोडा साठा शिल्लक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इराणच्या आधी इस्रायलच अणुबॉम्ब टाकू शकतो का? जर असे होत असेल तर हे रोखण्याची जबाबदारी कुणाची?

मेगन केली यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत असताना रॉबर्ट पेप म्हणाले, “इस्रायल अणुबॉम्बचा वापर करणार असेल तर मला याकडे नैतिकदृष्ट्या नाही तर सामरिकदृष्ट्या पाहावे लागेल. इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब टाकल्यास त्याचे किरणोत्सर्ग (Radiation) संपूर्ण आखाती प्रदेशातील देशांपर्यंत पसरण्याची भीती आहे. सौदी अरेबिया, कतार आणि युएई पर्यंत पसरू शकतात. कदाचित त्यापुढेही जाऊन किरणोत्सर्गाचा धोका पोहचू शकतो. चेर्नोबील घटनेच्याही १०० पट अधिक धोका यामुळे उद्भवू शकतो. त्यामुळे इस्रायल अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेईल, असे वाटत नाही.”

इस्रायलमध्ये ७० लाख ज्यू लोकसंख्या आहे. तर त्यांच्या आजूबाजूला ५ कोटी मुस्लीम जनता विविध देशांत राहते. मुस्लीम इस्रायलला पसंत करत नाही, त्यांचा तिरस्कार करतात, ही बाब इस्रायललाही चांगली ठाऊक आहे. त्यामुळे इस्रायलला धडा शिकविण्यासाठी ते मृत्यूलाही कवटाळू शकतात, असेही रॉबर्ट पेप म्हणाले.

हमासचे २० हजार योद्धे इस्रायलशी लढताना मरण पावले. हेजबोलाचे २० हजार सैनिक मारले गेले आणि अजूनही मरण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी अणुबॉम्बचा वापर करणे केव्हाही घातक ठरू शकेल. यातून न भरून येणारे नुकसान होईल, असेही प्राध्यापक पेप म्हणाले.

Iran Nuclear Attack Mohammad Safa
संयुक्त राष्ट्रे इराणमध्ये अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराची तयारी करत असल्याचा आरोप मोहम्मद सफा यांनी केला.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पर्याय काय?

महिन्याभरानंतरही युद्धातून मार्ग न निघाल्यामुळे आता ट्रम्प यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. नो किंग्ज आंदोलन, मध्यावधी निवडणुका, प्रसिद्धीला लागलेला तडा यामुळे ट्रम्प कोणता निर्णय घेतील? असा प्रश्न केली यांनी प्राध्यापक पेप यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, मी ट्रम्प यांना तीन मुद्दे सुचवेल.

१) पहिला मुद्दा असा की, तुम्ही म्हणाल तेच होईल, हा हट्ट सोडा. आता इराण तुमच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. त्यांनी तुमच्या भुलथापांना केव्हाच नाकारलेले आहे.

२) दुसरे म्हणजे की, युद्ध संपविण्यासाठी तुम्ही त्यांच्या हिताचे मुद्दे मांडायला हवेत. ज्यात त्यांना (इराण) सुरक्षितता वाटेल. कारण ते सहजपणे जगातील २० टक्के तेल असेच सोडून देणार नाहीत.

३) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलकडून सुरू असलेला लष्करी हल्ला थांबायचे नाव नाही. ट्रम्पही इराणवर हल्ला करत आहेत. पण इस्रायलची हल्ल्याची तीव्रता अधिक आहे. जोपर्यंत इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत युद्धबंदीची चर्चा पुढे जाणार नाही. त्यामुळे इस्रायलचे हल्ले थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी वेळप्रसंगी इस्रायललाही लगाम घालावा, असे प्राध्यापक पेप यांनी सुचवले आहे.

Donald Trump and Benjamin Netanyahu Middle East War
इस्रायलला रोखणे हाच आता ट्रम्प यांच्यासमोर पर्याय

इस्रायलला लष्करीदृष्ट्या निष्प्रभ करणं हाच एक पर्याय

प्राध्यापक रॉबर्ट पेप पुढे म्हणाले, इराणकडे होर्मुझ सामुद्रधुनीचे नियंत्रण नसते तर मी ट्रम्प यांना वेगळा सल्ला दिला असता. पण होर्मुझ सामुद्रधुनीमुळे अनेक राजकीय समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे युद्धबंदीबद्दल पेच निर्माण झाला असून ट्रम्प यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. ट्रम्प यांची अवस्था अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्याप्रमाणे झाली आहे.

मी सध्या एवढेच म्हणेन की, इस्रायलला लष्करीदृष्ट्या निष्प्रभ केले तरच डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपद वाचू शकेल. जर ट्रम्प यांनी तरीही जमिनीवरील हल्ला करण्याचा निर्णय घेतला तर त्याचे न भरून येणारे परिणाम भोगावे लागू शकतात.

व्हिएतनाम युद्धाची आठवण

रॉबर्ट पेप यांच्या विश्लेषणानंतर मेगन केली यांनी अमेरिकेने याआधी लढलेल्या युद्धात झालेली हानी पुन्हा एकदा सांगितली. व्हिएतनामचे युद्ध आठ वर्ष चालले. ५ लाख ४३ हजार अमेरिकन सैनिक या युद्धमोहिमेवर गेले होते. त्यापैकी ५८ हजार सैनिक मारले गेले. तर १ लाख ५३ हजार सैनिक गंभीर जखमी झाले. अशी हानी पुन्हा व्हावी, असे कुणालाही वाटत नाही.

रॉबर्ट पेप म्हणाले की, माजी राष्ट्राध्यक्ष जॉन्सन यांनी ते युद्ध सुरू केले नसते, बॉम्ब वर्षाव केला नसता तर ५८ हजार सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. यामुळेच अमेरिकेच्या इतिहासात जिमी कार्टर यांच्यापेक्षाही लिंडन जॉन्सन हे सर्वात अकार्यक्षम आणि वाईट राष्ट्राध्यक्ष ठरले. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हेच सांगेल की, त्यांनी या रांगेत बसू नये. त्यांनी लवकरात लवकर इस्रायलवर लष्करी निर्बंध घालावेत.