दुबई : इस्रायलने प्रमुख लष्करी हवाईतळ आणि आण्विक स्थळ असलेल्या इराणच्या मध्य इस्फान शहरावर शुक्रवारी ड्रोन हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल इराणनेही इस्रायलच्या तीन ड्रोनना लक्ष्य केले. या ताज्या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणाव टोकाला पोहोचला असून पश्चिम आशियावर युद्धाचे ढग जमू लागले आहेत.

इराणमधील इस्फान शहराच्या अवकाशात शुक्रवारी पहाटे काही स्फोटांचे आवाज ऐकू आले. सूत्रांनी इस्रायलने इराणवर ड्रोन हल्ला केल्याचे म्हटले असले तरी इराणने मात्र त्याला फारसे महत्त्व दिलेले नाही. तथापि, इराणने इस्रायलच्या ड्रोनला लक्ष्य करणारी संरक्षणप्रणाली सज्ज केल्याचे वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिले आहे. या घडामोडींच्या  पार्श्वभूमीवर इराणच्या महत्त्वाच्या शहरांतील विमानांची उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. तर एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेलअवीव दरम्यानची विमान सेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्याची घोषणा शुक्रवारी केली.

हेही वाचा >>> अल्पवयीन बलात्कारपीडितेची गर्भपातासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने, वैद्यकीय तपासणीचे निर्देश

इराणच्या लष्करी अधिकाऱ्याने इस्रायलच्या हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली, तर दुसरीकडे इस्रायली सैन्यानेही त्याबाबत कोणतेही भाष्य अद्याप केलेले नाही. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनीही इस्रायलच्या इराणवरील कथित हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रियेस नकार दिला असला तरी अमेरिकी ब्रॉडकास्ट नेटवर्कने मात्र एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने इराणवर इस्रायलनेच हल्ला केल्याचे वृत्त दिले आहे. या हल्ल्यात कोणतीही हानी झालेली नाही.  

इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हल्ला केल्यानंतर आणि इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पश्चिम आशिया युद्धाच्या छायेत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जी-७ देशांचा इशारा

जेरुसलेम : जी-७ राष्ट्रांनी इराणवर नवे निर्बंध लादण्याचा इशारा दिला. इराणने इस्रायली ड्रोनला लक्ष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. तसेच दोन्ही देशांनी आपआपसातील तणाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा सल्लाही जी-७ देशांनी दिला आहे.

एअर इंडियाची वाहतूक स्थगित

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवदरम्यानची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि तेल अवीवदरम्यान दर आठवडयाला चार विमानसेवा चालवण्यात येतात, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.