Acid rain fears in Tehran Israel-Iran war: इराणवर अमेरिका आणि इस्त्रायकडून होणारे हल्ले तीव्र झाले आहेत. इस्त्रायलने तेहरानमधील तेल साठ्यांवर हवाई हल्ला केल्यामुळे इराणमध्ये नव्या संकटाने तोंड वर काढले आहे. तेल साठ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे धुराचे प्रचंड लोट हवेत पसरले असून, सर्वत्र विषारी धुराची चादर दिसून येत आहे. काही ठिकाणी अ‍ॅसिड रेनचा (आम्ल पाऊस) वर्षाव झाल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. इस्रायलने शनिवारी रात्री तेहरान आणि अल्बोर्झमधील अनेक तेल साठ्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.

सर्वत्र विषारी धुराचे लोट

इस्त्रायलने इराणमधील तेल साठ्यांना लक्ष्य केल्यानंतर मोठा स्फोट झाल्यानंतर आगीच्या ज्वाळांचे प्रचंड निदर्शनास पडले. सासह धुरांचे लोट हवेत पसरले आहेत. दाट धुक्यासारखे विषारी धूराचे साम्राज्य सध्या राजधानी तेहरानमध्ये पाहायला मिळत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. शनिवारी रात्री हे चित्र तेहरानमध्ये दिसून आले यामुळे येथील नागरिक धास्तावले आहेत. 

नागरिकांना उद्भवल्या आरोग्य समस्या

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. वातावरणात हायड्रोकार्बन आणि धूर अधिक असल्याने नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. शनिवारी काही ठिकाणी आम्ल पावसामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्तात म्हटले आहे. 

हवाई हल्ल्यात ६ मृत्यू, २० जखमी

इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, २० जखमी झाल्याचे वृत्त आहे. पावसामुळे अनेकांना घशाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ असे त्रास होऊ लागल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. 

नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला

इराणमधील पर्यावरणसंबधित संस्थांनी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. विषारी धुरामुळे नागरिकांना त्वचा आणि फुफुसाचे आजार होण्याचा धोका आहे. पावसाची शक्यता दिसल्यास बाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. तसेच, नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

स्थानिकांना भीती

आमच्यासोबत काय होईल माहिती नाही. सध्यातरी आमच्याकडे पाणी, इलेक्ट्रिक कनेक्शन आणि अन्न आहे. प्रत्येक दिवस रात्र, खाणं, झोपणं आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि भितीदायक होत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी फॉर्च्युनला दिली आहे.