Israel Iran War Analysis impact on India: गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिका, इस्रायल व इराण या तीन देशांच्या साठमारीत अवघ्या जगाचं नाक दाबलं गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कारण या तीन देशांमधल्या युद्धामुळे इंधनाचा मोठा तुटवडा जगभरात निर्माण झाला. त्यापाठोपाठ पर्यायानेच येणारा इतर वस्तूंचा तुटवडा आणि त्यासोबत हातात हात घालून येणारी महागाई या गोष्टी जगभरातल्या नागरिकांप्रमाणेच भारतीय नागरिकांसाठीही प्रचंड त्रासदायक ठरू लागल्या आहेत. अमेरिका किंवा इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी इराणमधल्या तेलविहिरींवर मारा झाला आणि परिणाम भारतातल्या गल्लीबोळात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना, कुटुंबांना भोगावा लागला. पण तरीदेखील भारतानं या सगळ्या प्रकारात अद्याप तटस्थपणाचीच भूमिका घेतल्याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी परखड शब्दांत भूमिका मांडली आहे.

“याहून चुकीची भूमिका असू शकत नाही”

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या तीन देशांच्या भांडणात भारत दलाली करणार नाही, अशा आशयाचं विधान केल्यानंतर त्यावर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पातळीवर मोठी चर्चा पाहायला मिळाली. पण भारताकडून याहून चुकीची भूमिका असू शकत नाही, असं मत गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे.

“भारतानं या प्रश्नावर व्यक्त केलेली भूमिका शहाणपणाची होती असं म्हणता येणार नाही. कुठल्यातरी येऱ्यागबाळ्याने असं मत व्यक्त केलं असतं तर चाललं असतं. पण ज्यांनी आख्खी हयात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत घालवली आहे, ते परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की भारत यात दलाली करणार नाही. याच्याइतकी टोकाची, चुकीची भूमिका असूच शकत नाही”, असं ते म्हणाले.

“१९५० साली कोरियन युद्ध झालं. भारत देश म्हणून अस्तित्वात येऊन ३ वर्षं झाली होती. पणिक्कर नावाचे जयशंकर यांचे पूर्वसूरी आपले मुत्सद्दी होते. तेव्हा कोरियन युद्धात पणिक्कर यांना मध्यस्थी करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं. तेव्हा भारताच्या मध्यस्थीमुळे चीन व पाश्चात्य जग यांच्यातलं युद्ध थांबलं. त्याचं श्रेय भारताला दिलं गेलं. जनरल थिमय्या यांच्याकडे संयु्क्त राष्ट्रांनी शांतता मोहिमेचं नेतृत्व दिलं. त्यांच्यामुळे किमान २० हजार नागरिकांचे प्राण वाचले होते. हा आपला इतिहास आहे. त्यामुळे अशा कामाला दलाली म्हणणं चुकीचं आहे”, असा ऐतिहासिक संदर्भ गिरीश कुबेर यांनी यावेळी दिला.

भारताची बस चुकली?

“एकदा तुम्ही टोकाची भूमिका घेतली तर मग तु्म्हाला पुढे जाता येत नाही. भारतानं माहिती-तंत्रज्ञानाची बस चुकवली. भारताला सेमीकंडक्टरची बस सापडली नाही. त्याचप्रमाणे या मुद्द्यावरही भारताची बस चुकली”, असंही गिरीश कुबेर यांनी नमूद केलं.

युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना काय मिळालं?

दरम्यान, इस्रायल व इराण यांच्यातल्या भांडणात पडून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाही या युद्धात खेचलं. त्याबदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं काय साध्य झालं? यावर तर्क लावले जात आहेत. पण वास्तवात या प्रकारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चंच हसं करून घेतलं आहे, अशी भूमिका गिरीश कुबेर यांनी मांडली आहे.

“इराणनं १० मुद्दे पुढे केले. ट्रम्प यांनी शेवटचा संघर्ष करण्यासाठी दिलेली मुदत संपायला तासभर शिल्लक असताना त्यांनी युद्धविरामासाठी हे १० मुद्दे मान्य केले. पण हेच १० मुद्दे बराक ओबामांच्या करारातदेखील होते. इराणला होर्मुझच्या करारावर स्वामित्व राहील, इराणला आणुऊर्जेसाठीच्या इंधन प्रक्रियेचा अधिकार असेल, इराणवरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवले जातील आणि इराणला विकासासाठी इतर देशांकडून मदत घेता येईल हे सगळं तेव्हाही होतंच. उलट आता या स्थितीमुळे अमेरिकेला एक पाऊल मागे जावं लागेल. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चंच हसं करून घेतलं आहे”, असं विश्लेषण गिरीश कुबेर यांनी याबाबत केलं.

“इराणनं होर्मुझवर शुल्क लावलं तर ती इराणसाठी एक प्रकारची टोल व्यवस्था होऊन जाईल आणि आपल्याकडे जशी ठराविक लोकांनाच टोलची कंत्राटं मिळतात, तसं होर्मुझच्या टोलची कंत्राटंही अमेरिका आणि इराणकडेच जाऊ शकतात”, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

युद्धविराम ही डोनाल्ड ट्रम्प यांचीच गरज होती का?

दरम्यान, अमेरिका-इस्रायल-इराण या युद्धाला तात्पुरता का होईना, विराम लागणं ही अमेरिकेचीच गरज होती का? असा प्रश्न विचारला असता गिरीश कुबेर यांनी त्याला दुजोरा दिला. “कोणतंच युद्ध कधीच थांबत नसतं. आपलंही ऑपरेशन सिंदूर अजून चालूच आहे. शस्त्रसंधीच आहे तिथे. चर्चा करतच पुढे जावं लागणार आहे. पण जितके तुम्ही कथित सामर्थ्यवान, तितकी तुम्हाला माघार घेणं अवघड असतं. तेच डोनाल्ड ट्रम्प यांचं झालं होतं. इराण आणि अमेरिका दोन्ही देशांना युद्धविरामाची गरज होतीच. पण अमेरिकेला ती गरज जास्त होती. एक फुटावरून पडणारा आणि २० फुटांवरून पडणारा यांच्यात उंचावरून पडणारा जास्त वेगाने पडतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धविरामाची जास्त गरज होती”, अशा शब्दांत गिरीश कुबेर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची परिस्थिती सोदाहरण स्पष्ट करून सांगितली.

बिन्यामिन नेतान्याहूंमुळे डोनाल्ड ट्रम्प युद्धात!

युद्ध इस्रायल व इराण यांच्यातलं असताना नेतान्याहू यांच्या प्रतिमासंवर्धनाच्या प्रयत्नात डोनाल्ड ट्रम्प अकारण ओढले गेले, असं विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केलं. “हे युद्ध नरसंहारी नेतान्याहू यांचं आहे. व्हाईट हाऊसमधल्या सिच्युएशन रूममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर नेतान्याहू होते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या मागे ओढले गेले. देशप्रेम हा बदमाशांचा शेवटचा आसरा असतो. तसा तो नेतान्याहू यांच्यासाठी आहे. कारण सगळीकडून तो माणूस भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत, राजकीय संकटात अडकला आहे. त्यामुळे अंतर्गत संकटात अडकल्यानंतर शत्रू तयार करून राष्ट्रीयत्वाच्या भावनेला हात घालणं हे नेहमीच यशस्वी होत आलं आहे. त्यामुळे हे युद्ध नेतान्याहूंची गरज होती आणि ती डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण केली”, असं ते म्हणाले.