Israel Iran War : अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अनेकदा थेट युद्धाची धमकी दिली होती. त्यामुळे या दोन्ही देशातील वाद थांबण्याची चिन्हं दिसत नसतानाच आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने आज इराणची राजधानी तेहरानवर भीषण हल्ले केले आहेत.
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तेहरानमध्ये शनिवारी अनेक मोठे स्फोट झाले आहेत. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा केली आहे. दरम्यान इराण देखील इस्रायलला जशास तसं प्रत्युत्तर देत असून पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि इराणमधील या युद्धाच्या घडामोडीबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू काय म्हणाले?
“एक तासापूर्वी इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील दहशतवादी राजवटीने निर्माण केलेल्या अस्तित्वाच्या धोक्याचं उच्चाटन करण्यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं त्यांच्या ऐतिहासिक नेतृत्वाबद्दल आभार मानतो. या खुनी दहशतवादी राजवटीला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी देता कामा नये. ज्यामुळे ते संपूर्ण मानवतेसाठी धोका बनू शकते”, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.
‘तुमचे सरकार ताब्यात घ्या’, ट्रम्प यांचे इराणी जनतेला आवाहन
इराणची राजधानी तेहरानवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. आज सकाळी इराणच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्यांनी या हल्ल्यामागे अमेरिका आणि इस्रायल यांचा सहभाग असल्याचे मान्य केले. ट्रुथ सोशल मीडियावर ट्रम्प यांनी एक सविस्तर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी इराणी जनतेलाही आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या निवेदनात इराणी जनतेला उद्देशून म्हणाले, “तुमच्या स्वातंत्र्याची वेळ जवळ आली आहे. युद्धादरम्यान सुरक्षित स्थळी आश्रय घ्या. तुमच्या घरातून बाहेर पडू नका. बाहेर सध्या धोका असेल. सर्वत्र बॉम्बचा वर्षाव होत असेल. जेव्हा आमचा हल्ला पूर्ण होईल. तेव्हा तुम्ही तुमचे सरकार ताब्यात घ्या. ते तुमचे स्वतःचे सरकार असेल.”
“शस्त्रे खाली ठेवा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संदेशात म्हटले की, “इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड, सशस्त्र दल आणि सर्व पोलिसांना मी आज रात्री आवाहन करतो की तुम्ही तुमची शस्त्रे खाली ठेवा आणि पूर्ण शरणागती पत्करा. अन्यथा तुम्हाला निश्चित मृत्यूला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शस्त्रे खाली ठेवा, शरणागती स्वीकारल्यास तुमच्याशी पूर्ण संरक्षणासह वागणूक दिली जाईल.”
