Israel Iran War Khamenei 2014 Post Viral Update : इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा याबाबत अमेरिका आणि इस्रायलकडून दबाव आहे, यासंदर्भात वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिका आणि इस्रालयने इराणवर जोरदार हल्ले केले. दरम्यान, या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृ्त्त आहे. दरम्यान, खामेनी यांनी २०१४ साली इस्रायलबाबत एक पोस्ट केली होती. तीच पोस्ट आता इस्रायलच्या लष्कराने शेअर केली आहे.
संपूर्ण इराणमध्ये हल्ले करण्यात आले असून राजधानी तेहरानवर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत होते, तसेच स्फोटांचे आवाजही ऐकू येत होते. इराणच्या धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले. इराणनेही इस्रायलसह कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती येथील अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले करून संघर्षाची व्याप्ती वाढवली.
दरम्यान, खामेनी यांनी २०१४ साली एक्स पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं, “दिवसेंदिवस इस्रायली राजवट विस्फोट आणि विनाशाच्या जवळ पोहोचली आहे.”
आता हीच पोस्ट इस्रायलच्या लष्कराने म्हणजेच इस्रायल डिफेन्स फोर्सेसने शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नष्ट झालेली एकमेव गोष्ट म्हणजे तुम्हीच आहात.”
इतिहासातील क्रूर माणसाचा अंत-डोनाल्ड ट्रम्प
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या घोषणेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इतिहासातील अत्यंत वाईट व्यक्तींमधील एक असलेल्या खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. खामेनी यांचा मृत्यू हा केवळ इराणी जनतेसाठीच नाही तर अमेरिकन नागरिकांसह जगभरातील पीडितांसाठी न्याय असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच, इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची ही एकमेव मोठी संधी आहे. असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
हल्ले कशासाठी?
इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा याबाबत अमेरिका आणि इस्रायलकडून दबाव होता. इराण युरेनियम समृद्धीकरणाची पातळी अणुऊर्जा कार्यक्रमापुरती मर्यादित ठेवण्यास राजी झाला होता. मात्र क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमही आवरता घ्यावा ही अमेरिकेची मागणी त्यास मंजूर नव्हती. यासंबंधी वाटाघाटी ओमानमध्ये सुरू होत्या. त्यांच्या समाप्तीआधीच अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केले.
