US Consulate In Karachi Under Attack : अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण आणखी आक्रमक प्रतिहल्ले करत आहे. त्यामुळे आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.
असं असताना आता अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकन दूतावासावर जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. खामेनी यांच्या मृत्यूमुळे शिया समुदाय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने कराची येथील अमेरिकन दूतावासावर काही जमावाने संतप्त होत सुरक्षा व्यवस्था भेदून आतमध्ये प्रवेश करत दगड आणि काठ्यांनी तोडफोड केली आहे.
तसेच अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाच्या काचा फोडत इमारतीला आग लावण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर सुरू केलेल्या हल्ल्यांच्या विरोधात पाकिस्तानात निदर्शने काढण्यात आले आहेत. या निदर्शनांदरम्यान अमेरिकन दूतावासाबाहेर निदर्शनांना हिंसक वळण लागलं आहे. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षक आणि निदर्शनकर्ते यांच्यात झालेल्या संघर्षात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा मोठा इशारा
इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणने नुकतंच म्हटलं की ते आज खूप मोठा हल्ला करणार आहेत. जो त्यांनी (इस्रायल-अमेरिकेने) यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मात्र, त्यांनी (इराणने) असं करून नये. कारण जर इराणने असं केलं तर आपण त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू, ज्याची पूर्वी इराणने कधीही कल्पना केली नसेल”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
