IDF strikes on Hezbollah Lebanon: शनिवारी (२८ फेब्रुवारी) सुरू झालेल्या इस्रायल आणि इराणमधील युद्धाने मोठे स्वरूप धारण केले आहे. या युद्धात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला चढवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये यूएई, बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केले आहे. दरम्यान, इस्रायलमध्ये देशभर सायरन वाजत असल्याची माहिती आयडीएफने दिली आहे. देशातील लाखो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. अशातच इस्रायलवर आणखी एका देशाकडून हल्ला झाल्याची माहिती आयडीएफने दिली आहे.
इस्रायलच्या आयडीएफने केलेल्या दाव्यानुसार, उत्तर इस्रायलमध्ये लेबनॉनमधील हिजबुल्लाहने हल्ला केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. पुढे आयडीएफने असेही म्हटले आहे की, हिजबुल्लाह इराणी राजवटीच्या वतीने काम करत असून ते इस्रायली नागरिकांवर गोळीबार करत आहेत. त्यांच्या बाजूने सातत्याने गोळीबार सुरू आहे. ते विनाकारण स्वतःच्या (लेबनॉनच्या) विनाशाला कारणीभूत ठरत आहेत, असेही आयडीएफने म्हटले आहे.
लेबनॉनच्या हिजबुल्लाहकडून झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. सध्या इस्रायल इराण आणि लेबनॉनविरोधात दोन आघाड्यांवर लढत आहे. लेबनॉनला दिले जात असलेले प्रत्युत्तर ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’चा भाग असल्याची माहिती आयडीएफने दिली आहे. या परिस्थितीसाठी आम्ही पूर्वीपासून सज्ज होतो आणि सर्व आघाड्यांवर लढण्यासाठी तयार आहोत, असेही आयडीएफने स्पष्ट केले.
‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ ही इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध सुरू केलेली मोठ्या प्रमाणातील संयुक्त लष्करी मोहीम आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट इराणचा अणुकार्यक्रम, क्षेपणास्त्र क्षमता आणि लष्करी नेतृत्व निष्प्रभ करणे आहे. इस्रायल आपल्या कारवाईला ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ असे संबोधत असताना, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्याच्या समांतर मोहिमेला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव दिले आहे.
इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि महत्त्वाचे मंत्री ठार झाल्याचा दावाही अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
