वृत्तसंस्था, दुबई
इस्रायलने इराणविरुद्ध हल्ले तीव्र आणि विस्तारण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच शुक्रवारी इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ले झाले, असे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले. इराणनेही याला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली असून, इस्रायलने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘आयआरएनए’च्या वृत्तानुसार, एक पाणी प्रकल्प आणि यलोकेक उत्पादन प्रकल्पावर हल्ला करण्यात आला. इराणच्या अणुऊर्जा संघटनेने सांगितले की, आराकमधील शाहिद खोंडाब ‘हेवी वॉटर कॉम्प्लेक्स’ आणि यझद प्रांतातील ‘अर्दाकान यलोकेक’ उत्पादन प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आराकमधील हा प्रकल्प गेल्या जूनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यापासून कार्यान्वित नव्हता.

इराणमधील क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता, अणू कार्यक्रमातील उर्वरित पायाभूत सुविधा आणि दहशतवादी राजवटीच्या ठिकाणांसह अनेक लक्ष्यांवर केलेल्या हल्ल्यांचे इस्रायलने स्वागत केले आहे. तर अणू प्रकल्पांवरील या हल्ल्याचा इराण बदला घेईल, असा इशारा ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (आयआरजीसी) दिला असल्याचे ‘आयआरएनए’ने म्हटले आहे.

तत्पूर्वी इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे आणि इतर शस्त्रास्त्रांचे उत्पादन जिथे होते, तिथे इस्रायलने शुक्रवारी हल्ले केले. पश्चिम इराणमधील क्षेपणास्त्र प्रक्षेपकांनाही लक्ष्य केले. इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी इराणवरील हल्ल्यांची तीव्रता आणि विस्तार वाढविण्याचा इशारा दिला आहे.

ट्रम्प यांच्यावर वाढता दबाव?

  • शेअर बाजाराची घसरण आणि युद्धाचे आर्थिक परिणाम पश्चिम आशियाच्या पलीकडे पोहोचत असल्याने, ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वरील इराणची पकड सोडवण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत आहे. परंतु, इराणने अमेरिकेचा १५-कलमी युद्धविराम प्रस्ताव फेटाळला आहे, ज्यामध्ये सामुद्रधुनीवरील नियंत्रण सोडण्याचा समावेश होता. याउलट, इराणने या भागात हजारो अतिरिक्त सैन्य तैनात केले आहेत.

ऊर्जा क्षेत्रांवरील हल्ल्यांना पुन्हा मुदतवाढ

इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यावरून सुरुवातीला ४८ तासांचा इशारा देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा क्षेत्रांवरील हल्ल्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. इराणबरोबरील चर्चा चांगली होत असल्याचे सांगून ट्रम्प यांनी ६ एप्रिलपर्यंत इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नसल्याचे सांगितले. इराणने अमेरिकेबरोबर कुठल्याही प्रकारे वाटाघाटी सुरू नसल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेची सैन्याची जमवाजमव

एकीकडे राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू असताना अमेरिकेच्या युद्धनौका पश्चिम आशिया क्षेत्राच्या अधिक जवळ आल्या आहेत. अमेरिकेचे सुमारे अडीच हजार मरीन्स या क्षेत्रात आहेत. याखेरीज शत्रूप्रदेशात उतरून महत्त्वाची ठिकाणे काबीज करण्यासाठी तरबेज एक हजार पॅराट्रूपरना या क्षेत्रात जाण्याचे आदेश दिले आहेत.

अन्य घडामोडी

  • इराणची क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडल्याचा सौदी अरेबियाचा दावा.
  • कुवेतमधील दोन बंदरांवर इराणच्या हल्ल्यामुळे नुकसान. येथे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत प्रकल्पाच्या कामाचे नुकसान. चीनच्या प्रकल्पाचे नुकसान होण्याची पहिलीच वेळ.
  • ईजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांचे तुर्की आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर चर्चा. इराण-अमेरिकेत समेट घडविण्यासाठी प्रयत्न.
  • स्थलांतरितांसाठीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेल्या माहितीनुसार इराणमध्ये ८२ हजार नागरी इमारती लक्ष्य झाल्या आहेत. त्यात रुग्णालये आणि १.८० लाख नागरिकांच्या घरांचे नुकसान.
  • लेबनॉनमध्ये आतापर्यंत ११००, तर इराणमध्ये १९०० जणांचा मृत्यू

‘इस्रायली सैन्य कोलमडू शकते’

तेल अविव : पश्चिम आशियातील संघर्षामुळे लष्करी सेवेतील वाढता दबाव आणि मनुष्यबळाची भासणारी तीव्र कमतरता यामुळे इस्रायली सैन्य कोलमडून पडू शकते, असा इशारा इस्रायल संरक्षण दलाचे (आयडीएफ) चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल इयाल झमीर यांनी गुरुवारी दिला आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने स्थानिक वृत्तांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. इस्रायलच्या ‘चॅनेल १३ न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, झमीर यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधान केले. या वेळी त्यांनी सैन्याच्या सज्जतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.