पीटीआय, दुबई, नवी दिल्ली

इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या वायू क्षेत्राला लक्ष्य केल्यानंतर इराणने सौदी अरेबिया, यूएई, कतारमधील महत्त्वाच्या तेल, नैसर्गिक वायू केंद्रांवर हल्ले केल्यानंतर जागतिक तेलसंकट आणखी चिघळले. तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिपिंप ११४ डॉलरच्या पुढे गेला आणि जागतिक शेअर बाजारांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला.

दिवसभरात मुंबई शेअर बाजार २४९६.८९ अंशांनी कोसळून ७४,२०७.२४ अंशांवर स्थिरावला. जागतिक पातळीवरील या संकटाने भारताला चिंतेत पाडले असून पश्चिम आशियातील गॅस केंद्रांवरील हल्ले अस्वीकार्य असल्याची भूमिका भारताने घेतली.

इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स येथील जगातील सर्वांत मोठ्या वायू क्षेत्राला बुधवारी लक्ष्य केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सौदी अरेबिया, यूएई आणि कतारमधील महत्त्वाच्या तेल, नैसर्गिक वायू केंद्रांवर जोरदार हल्ले केले. तेल आणि नैसर्गिक वायूंची महत्त्वाची केंद्रे लक्ष्य झाल्याने जगभरातून चिंता व्यक्त करण्यात आली. आखाती देशांमधील ऊर्जा सुविधांवरील वाढते हल्ले, त्यामुळे वधारलेल्या खनिज तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारातील कमकुवत कल यांचा परिणाम शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये तीन टक्क्यांहून अधिक मोठी घसरण नोंदवली गेली. एचडीएफसी बँकेच्या समभागांतील मोठ्या घसरणीनेही निर्देशांकाच्या गटांगळीस हातभार लावला. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतानू चक्रवर्ती यांनी आकस्मिक राजीनामा दिल्याचे नकारात्मक परिणाम बाजारात दिसून आले. आधीच्या तीन दिवसांत निर्देशांकाने केलेली कमाई पूर्णपणे धुऊन काढणार्‍या या आपटीने गुंतवणूकदारांना सुमारे १३ लाख कोटी रुपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागला.

पश्चिम आशियातील गॅस केंद्रांवरील ताज्या हल्ल्यांमुळे चिंता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया भारताने दिली. हे हल्ले अस्वीकार्य असून ते थांबले पाहिजेत. हे हल्ले जागतिक स्तरावर आधीच अनिश्चित असलेल्या ऊर्जा परिस्थितीला आणखी अस्थिर करतील, अशी चिंता भारताने व्यक्त केली. ही परिस्थिती केवळ देशासाठी नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी कसोटीचा काळ आहे, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

इस्रायलच्या हल्ल्याबाबत काहीही माहिती नव्हती -ट्रम्प

इस्रायलने इराणमधील साउथ पार्स येथील नैसर्गिक वायू केंद्रावर केलेल्या हल्ल्याबाबत अमेरिकेला काहीही माहीत नव्हते. इस्रायल पुन्हा साउथ पार्सला लक्ष्य करणार नाही, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

मात्र त्याच वेळी इराणने कतारमधील ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केले, तर अमेरिका इराणवर जोरदार हल्ले करील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. ‘‘इस्रायलने संतप्त होऊन इराणमधील वायू केंद्रांवर हल्ले केले. मात्र या संपूर्ण केंद्राच्या तुलनेने लहान भागावर हल्ला झाला आहे. अमेरिकेला या विशिष्ट हल्ल्याबद्दल काहीही माहिती नव्हती. कतार देशाचा यात कोणत्याही प्रकारे सहभाग नव्हता, तसेच असा हल्ला होणार आहे याची कोणतीही कल्पना नव्हती,’’ असे ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर सांगितले.

रशियाकडून एलपीजी खरेदीचा पर्याय

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्यासाठीचे पर्याय वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून जिथे कुठे एलपीजी उपलब्ध असेल, तिथून खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार रशियाकडूनही एलपीजी खरेदी करण्यास इच्छुक आहे, असेही ते म्हणाले. ग्राहकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध देशांच्या संपर्कात आहोत, असे जयस्वाल यांनी सांगितले.

वायू केंद्रांवरील हल्ल्यांचा निषेध

पश्चिम आशियाई वायू केंद्रांवरील ताज्या हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली असतानाच हे हल्ले अस्वीकार्य असून ते थांबले पाहिजेत, अशी भूमिका भारताने घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमान, फ्रान्स आणि मलेशियाच्या राष्ट्रप्रमुखांशी संपर्क साधला आणि या अस्थिर प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याची तातडीने गरज आहे, असे सांगितले.