Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर आज मोठे हवाई हल्ले केले आहेत, तर इराणनेही अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत प्रतिहल्ले केले आहेत. त्यामुळे आता अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध भडकलं आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तेहरानमध्ये शनिवारी अनेक मोठे स्फोट झाले आहेत.
इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा केली. दरम्यान इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात दक्षिण इराणमधील ४० शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे.
इस्रायल-अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात इराणच्या मिनाबमधील किमान ४० शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचं वृत्त IRNA या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. इराणच्या होर्मोज्गान प्रांतातील मिनाब येथे झालेल्या हल्ल्यात किमान ४५ जण जखमी झाले असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या हल्ल्यात ४० शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला असला तरी याबाबत अमेरिका किंवा इस्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
‘तुमचे सरकार ताब्यात घ्या’, ट्रम्प यांचे इराणी जनतेला आवाहन
इराणची राजधानी तेहरानवर इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. आज सकाळी इराणच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्यांनी या हल्ल्यामागे अमेरिका आणि इस्रायल यांचा सहभाग असल्याचे मान्य केले. ट्रुथ सोशल मीडियावर ट्रम्प यांनी एक सविस्तर व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्यांनी इराणी जनतेलाही आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या निवेदनात इराणी जनतेला उद्देशून म्हणाले, “तुमच्या स्वातंत्र्याची वेळ जवळ आली आहे. युद्धादरम्यान सुरक्षित स्थळी आश्रय घ्या. तुमच्या घरातून बाहेर पडू नका. बाहेर सध्या धोका असेल. सर्वत्र बॉम्बचा वर्षाव होत असेल. जेव्हा आमचा हल्ला पूर्ण होईल. तेव्हा तुम्ही तुमचे सरकार ताब्यात घ्या. ते तुमचे स्वतःचे सरकार असेल.”
“शस्त्रे खाली ठेवा, अन्यथा मृत्यूला सामोरे जा!”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्यांनंतर दिलेल्या संदेशात म्हटले की, “इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड, सशस्त्र दल आणि सर्व पोलिसांना मी आज रात्री आवाहन करतो की तुम्ही तुमची शस्त्रे खाली ठेवा आणि पूर्ण शरणागती पत्करा. अन्यथा तुम्हाला निश्चित मृत्यूला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शस्त्रे खाली ठेवा, शरणागती स्वीकारल्यास तुमच्याशी पूर्ण संरक्षणासह वागणूक दिली जाईल.”
