Israel strikes Iran as massive Tehran explosions : इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला असून इराणने आता आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. अमेरिका आणि इस्लायने इराणवर प्रतिबंधकात्मक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं म्हटलं असून यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, या हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वसूचनाही दिली होती. इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या भीषण स्फोटांमुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यानंतर ही लष्करी कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. इराणने आपले धोरण न बदलल्यास कारवाई अटळ असल्याचे संकेत गेल्या अनेक आठवड्यांपासून वॉशिंग्टन आणि जेरूसलेममधून दिले जात होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला होता?
गेल्या काही आठवड्यांपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १० ते १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. १९ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, इराणकडे अमेरिकेसोबत अर्थपूर्ण तडजोड करण्यासाठी केवळ १० ते १५ दिवस आहेत. जर तेहरानने यावर ठोस पाऊल उचलले नाही, तर त्याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा देत अमेरिकेने या भागात आपली लष्करी फळी मजबूत केली होती.
इस्रायलने काय म्हटलं होतं?
२०२५ मधील इराण-इस्रायल युद्ध आणि इराणपुरस्कृत गटांशी झालेल्या चकमकींमुळे इस्रायली नेतृत्व आधीच सतर्क होते. जानेवारीतही इस्रायलने काही हल्ले केले होते. इराणच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमतेचा विस्तार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा पुनरुच्चार इस्रायलने वारंवार केला होता.
इराणने घेतली इस्रायल आणि अमेरिकेची परीक्षा
ट्रम्प यांनी दिलेली १० दिवसांची अनौपचारिक मुदत संपत असतानाच प्रादेशिक चिंता वाढली. रशिया, युरोपीय देश आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी संयम राखण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, “जर ट्रम्प यांची डेडलाईन कराराशिवाय संपली तर काय होईल?” यावर विश्लेषक चर्चा करत होते, ज्यातून इस्रायल इराणच्या जमिनीवर थेट कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. फेब्रुवारीच्या मध्यावर पाश्चात्य माध्यमांनी दिलेल्या गुप्तचर अहवालांनुसार, इराणने आपल्या संवेदनशील अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र हालचाली सुरूच ठेवल्या होत्या. यामुळे इराण केवळ अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या सहनशक्तीची परीक्षा घेत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
