दुबई : अमेरिकेने तीन अणुकेंद्रांवर केलेल्या माऱ्याचे प्रत्युत्तर म्हणून सोमवारी इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामुळे इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कतारनेही आपल्या भूमिवर झालेल्या हल्ल्याचे उत्तर दिले जाईल, असा इशारा इराणला दिला.
रविवारी अमेरिकेने इराणमधील तीन अणुकेंद्रांवर ‘बंकर बस्टर बॉम्ब’ टाकून तेथे कथितरित्या मोठे नुकसान केले. त्याला प्रत्युत्तर देत इराणने सोमवारी कतारमधील अमेरिकेच्या अल-उदैद तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणी सैन्यदलाने याला दुजोरा दिला असून अमेरिकेने डागलेल्या स्फोटकांइतकीच स्फोटके कतारमध्ये डागण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. कतारची राजधानी
दोहा येथे मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ‘‘कोणत्याही परिस्थितीत इराणवर झालेला हल्ला खपवून घेतला जाणार नाही. अशा हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे इराण नॅशनल गार्ड्सच्या निवेदनात म्हटले आहे. आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या युद्धखोर राज्यकर्त्यांचे अस्तित्व सहन करणार नाही, अशा शब्दांत इराणने अन्य अमेरिकी तळांवरही हल्ल्याचे संकेत दिले आहेत. कतारने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून प्रत्युत्तराचा आपला अधिकार अबाधित असल्याचे म्हटले आहे. इराणने मात्र ‘आपल्या मित्रराष्ट्र शेजाऱ्या’वर हा हल्ला नसून केवळ अमेरिकेच्या तळाला लक्ष्य करण्यात आल्याचे सांगत कतारला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. इराकमधील अमेरिकेच्या तळांवरही हल्ले झाल्याची माहिती आहे.
हवाई सीमा बंद
इराणच्या हल्ल्यांपूर्वी काही तास कतारने आपली हवाई सीमा सुरक्षेच्या कारणाने बंद केली होती. त्यानंतर पश्चिम आशियातील सर्वांत मोठे हवाई दळणवळणाचे केंद्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातींनीही आपली हवाई सीमा बंद केली आहे.
कच्च्या तेलाच्या दरांबद्दल चिंतानवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप ७६ ते ७८ डॉलर असे स्थिर राहिले असले तरी पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना हे दर वाढण्याचा धोका कायम आहे. तेलाची ३९ टक्के जागतिक वाहतूक होर्मुझच्या खाडीतून होते. त्या भागात कोणताही अडथळा आल्यास तेलाचे दर वाढून भारतासह इतर देशांच्या तिजोरीवर ताण येण्याची शक्यता आहे.