तेल अविव : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामध्ये तेल अविव आणि अन्य काही शहरांमध्ये मोठे नुकसान झाले. इराणच्या हल्ल्यांमध्ये किमान २० जण जखमी झाल्याचे तेथील बचाव पथके आणि माध्यमांनी सांगितले. इराणने इस्रायलवर किमान ३० क्षेपणास्त्रे सोडल्याचे सांगण्यात आले.
इराणने डागलेली कित्येक क्षेपणास्त्रे अडवण्यास किंवा निकामी करण्यास इस्रायलच्या लष्कराला पुरेसा वेळ मिळला नाही. या क्षेपणास्त्रांबाबत लष्कराने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर काहीच वेळात तेल अविव आणि जेरुसलेम या दोन शहरांमध्ये स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले. त्याशिवाय हायफा या बंदराच्या शहरालाही इराणने पुन्हा एकदा लक्ष्य केले. या सर्व शहरांमध्ये वारंवार सायरनचे आवाज ऐकू येत होते. दक्षिणेकडील बीरशिबा या शहरातही क्षेपणास्त्रांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
अनेक ठिकाणी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास प्राधान्य देण्यात आले. त्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश होता. इस्रायलमध्ये क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांचे वार्तांकन करण्यावर लष्कराचे कठोर निर्बंध आहेत. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, १३ जूनपासून आतापर्यत किमान ५० ठिकाणी मोठे नुकसान झाले असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
आपत्कालीन बैठकीची मागणी
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक आयोजित करावी अशी मागणी इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत आमिर सइद इरावणी यांनी केली आहे. अमेरिकेने इराणवर भयंकर हल्ले केले असून बळाचा बेकायदा वापर केला आहे असा आरोप त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा यांच्याअंतर्गत अमेरिकेला हल्ल्यांसाठी जबाबदार मानले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
अमेरिकेला कसे उत्तर देणार?
अमेरिकेच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इराणसमोर कोणकोणते संभाव्य पर्याय आहेत याबद्दल तज्ज्ञांनी काही शक्यता सांगितल्या आहेत. गेल्या कित्येक दशकांपासून अमेरिकेला आपल्यावर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी इराणने देशात आणि शेजारी देशांमध्ये बहुस्तरीय लष्करी क्षमता उभारल्या आहेत. त्याचा आता वापर केला जाऊ शकतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अमेरिका व इस्रायलची क्षेपणास्त्र क्षमता इराणपेक्षा कैकपटीने अधिक आहे, पण त्या नेहमीच निर्णायक ठरल्याचे अलिकडील इतिहासावरून दिसत नाही.
इराणपुढील पर्याय
● पश्चिम आशियातील कुवेत, बहारिन, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकेच्या विखुरलेल्या सैन्यांवर हल्ले चढवणे
● जागतिक तेलपुरवठ्याचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यात अडथळणे आणणे
● लवकरात लवकर अण्वस्त्र तयार करण्यासाठी पावले उचलणे
फोर्डो अणुकेंद्राच्या प्रवेशद्वाराचे नुकसान
अमेरिकेने हल्ला केलेल्या तीन अणुकेंद्रांपैकी फोर्डो या भूमिगत केंद्राच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाल्याचे उपग्रहाने पाठवलेल्या आणि ‘एपी’ने खातरजमा केलेल्या छायाचित्रांवरून दिसत आहे. वायव्य इराणमधील कोम प्रांतामधील पर्वताजवळ जमिनीखाली कित्येक मीटर खाली हे अणुकेंद्र आहे. हल्ल्यापूर्वी तपकिरी असलेला हा भाग हल्ल्यानंतर राखाडी झाल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेने हल्ला केलेल्या इराणमधील अणुकेंद्रांमधून किरणोत्सर्गात वाढ झाल्याचे कोणतेही चिन्ह नाही असा निर्वाळा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने (आयएईए) दिला आहे.
इराणमध्ये सत्तापालटाचे लक्ष्य नाही पेंटागॉन
वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेग्सेथ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्यांचे नियोजन आणि अमेरिकेची भूमिका याबाबत माहिती दिली. इराणमध्ये सत्तापालट घडवणे हे या मोहिमेमागील लक्ष्य नव्हते ही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच तीन अणुकेंद्रांवर हल्ले केल्यानंतर आम्हाला इराणबरोबर युद्ध करायचे नाही असेही त्यांनी सांगितले.
इराणला खासगीमध्ये संदेश पाठवून वाटाघाटी करण्याचे अमेरिकेने आवाहन केले आहे असे हेग्सेथ म्हणाले. इराणच्या अणुकार्यक्रमामुळे अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला होता, तो नाहीसा करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचे आदेश दिले असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. या कारवाईला ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ असे नाव देण्यात आले होते. त्याचे तपशीलही हेग्सेथ यांनी दिले. या हल्ल्यात १४ बंकर-बस्टर बॉम्ब, २४पेक्षा जास्त टॉमहॉक क्षेपणास्त्रे आणि १२५ लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला.
हल्ल्यांमुळे मोठी जीवितहानी
दुबई : इस्रायलने १३ जूनला इराणवर हल्ले केल्यापासून आतापर्यंत त्या देशामध्ये किमान ८६५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि ३,३९६ जण जखमी झाले आहेत अशी माहिती वॉशिंग्टनस्थित ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट्स या मानवाधिकार संघटनेने रविवारी दिली. ही प्राणहानी संपूर्ण इराणमध्ये झाली असल्याचे या संघटनेने सांगितले. मृतांमध्ये आतापर्यंत ३६३ नागरिक आणि २१५ सैनिक ठार झाल्याची ओळख पटली आहे.
‘बंकर बस्टर बॉम्ब’ नेमके काय आहेत?
‘बंकर बस्टर बॉम्ब’ डागण्याची क्षमता जगात केवळ अमेरिकी लष्कराकडे आहे. जमिनीखाली खोलवर असणारी लक्ष्ये भेदण्यासाठी या बॉम्बची निर्मिती करण्यात आली आहे. हे बॉम्ब सुरुवातीला जमिनीला भेदत खाली जातात आणि नंतर फुटतात. ‘जीबीयू-५७ ए/बी’ हे बॉम्ब अमेरिकेने डागले आहेत. हे ३० हजार पौंड वजनाचे अचूक हल्ला करणारे बॉम्ब असल्याची माहिती अमेरिकेच्या हवाई दलाने दिली आहे. हे बॉम्ब जमिनीखाली ६१ मीटरपर्यंत लक्ष्ये भेदू शकतात. एकापाठोपाठ एक असे दोन बॉम्बने अधिक खोलवरील लक्ष्ये भेदता येतात. इराणवर डागलेल्या बॉम्बमध्ये नेमके किती बॉम्ब वापरण्यात आले, हे समजू शकले नाही. हे बॉम्ब केवळ अमेरिकेकडेच असलेल्या ‘बी-२ स्टेल्थ बॉम्बर’नेच डागता येतात.
होर्मुझच्या खाडीचे महत्त्व काय?
● उत्तरेला इराण, दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये असलेली होर्मुझची खाडी हा सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत आणि यूएई येथून तेल निर्यातीचा मुख्य मार्ग आहे. विशेषत: कतारमधून येणारे अनेक द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी), मालवाहतूक या खाडीतून होते.
● अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने होर्मुझची खाडी बंद करण्याचा निर्णय इराण घेऊ शकते. होर्मुझच्या खाडीतील संभाव्य व्यत्यय ही एक प्रमुख चिंता आहे, ज्यातून भारताच्या सुमारे ६०-६५ टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते.
● या महत्त्वाच्या सागरी कॉरिडॉरमध्ये कोणतीही नाकेबंदी किंवा लष्करी वाढ भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम करेल, तेलाच्या किमती वाढवेल आणि देशात महागाईचा दबाव निर्माण करेल, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.
● आयातीच्या स्राोताचे विविधीकरण केले तर खाडी बंद केली तरी भारताला फारशी चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण रशियापासून अमेरिका आणि ब्राझीलपर्यंतचे पर्यायी स्राोत कोणतीही पोकळी भरून काढण्यासाठी सहज उपलब्ध आहेत, असे मत काही अर्थ विश्लेषकांनी व्यक्त केले.
ट्रम्प यांची नोबेलसाठी शिफारस, पाकिस्तानी नागरिक संतप्त
लाहोर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल सन्मान मिळावा, यासाठी शिफारस करणारे पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी नागरिकांच्या टीकेचे रविवारी लक्ष्य ठरले.
भारत-पाकिस्तानमधील संघर्षात निर्णायक हस्तक्षेप केल्याबद्दल पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल सन्मान मिळावा, यासाठी शिफारस करणारे औपचारिक पत्र नोबेल शांतता पुरस्कार समितीला पाठविले आहे. हे वृत्त प्रसारित होताच पाकिस्तानी सरकार अमेरिकेपुढे लाळघोटेपणा करीत असल्याची टीका सामाजिक माध्यमावर व्यक्त होऊ लागल्या.
पंतप्रधान शाहबाज शरीफ ट्रम्प यांना आता शौर्य, साहस पुरस्कारासह पाकिस्तानचा सर्वोच्च ‘निशान-ए-हैदर’ हा लष्करी सन्मानही देतील, अशी उपरोधिक टीका पाकिस्तानी नागरिकांनी ‘एक्स’वर केली.