USS Gerald R. Ford (CVN 78): इराणविरोधात सुरू असलेल्या अमेरिका आणि इस्त्रायलमधील युद्धाचा आज (ता. २ मार्च) तिसरा दिवस आहे. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धाला आता मोठा भडका उडाल्याचे दिसत आहे. या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इतर मोठे अधिकारी आणि मंत्र्यांचाही या कारवाईत मृत्यू झाल्याचा दावा अमेरिका आणि इस्त्रायलने केला आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणमधील महत्त्वाची कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर इराणचे नौदल मुख्यालय नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

इराणच्या नौदलाची नऊ जहाजे नष्ट

अमेरिकेने केलेल्या कारवाईत इराणची नऊ जहाजे बुडवल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच उर्वरित जहाजांचा शोध सुरू असून तीदेखील नष्ट केली जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट करत म्हटले आहे की, “मला नुकतीच माहिती मिळाली आहे की आम्ही इराणच्या नौदलाची नऊ जहाजे नष्ट करून बुडवली आहेत. त्यापैकी काही जहाजे मोठी आणि अत्यंत महत्त्वाची होती. आम्ही उर्वरित जहाजांचा शोध घेत आहोत. तीही लवकरच समुद्राच्या तळाशी जातील.”

USS Gerald R. Ford (Photo- U.S. Central Command)

‘हुकमी एक्का’ युद्धभूमीवर

आता अमेरिकेने आपला हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे. जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड’ (CVN 78) या युद्धात सक्रिय झाली आहे. या युद्धनौकेला ‘सीव्हीएन ७८’ म्हणूनही ओळखले जाते. ही नौका इराणविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अमेरिकेच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’साठी ही युद्धनौका सध्या पूर्व भूमध्य समुद्रात तैनात आहे. या युद्धनौकेवरून इराणच्या दिशेने लढाऊ विमाने सोडण्याचे काम केले जात आहे.

जगातील सर्वात मोठी युद्धनौका

‘यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड’ (CVN-78) ही अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक आणि जगातील सर्वात मोठी अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका आहे. ही ३३७ मीटर लांबीची नौका जुलै २०१७ मध्ये कार्यान्वित झाली. तिच्यावर ४,५०० हून अधिक नाविक तैनात राहू शकतात. प्रगत तंत्रज्ञान, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टम (EMALS) आणि अण्वस्त्र क्षमतेसह ही नौका “तरंगता किल्ला” म्हणून ओळखली जाते.

USS Gerald R. Ford (Photo- U.S. Central Command)

इराणी नौदलाचे मुख्यालय नष्ट

इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणच्या नौदलाचे मोठे नुकसान झाले असून नौदल मुख्यालय नष्ट केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तसेच या युद्धात अमेरिकेचे नौदल प्रभावी कामगिरी करत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नमूद केले आहे.

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ आणि ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’

‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ ही इस्त्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध सुरू केलेली मोठ्या प्रमाणातील संयुक्त लष्करी मोहीम आहे. या मोहिमेचा उद्देश इराणचा अणुकार्यक्रम, क्षेपणास्त्र क्षमता आणि लष्करी नेतृत्व कमकुवत करणे हा आहे. इस्त्रायल आपल्या कारवाईला ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ असे संबोधत आहे, तर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आपल्या समांतर कारवाईला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव दिले आहे.