Latest news on Iran US Israel war: मध्यपूर्वेत इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. या संघर्षाची सुरुवात अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्याने झाली. त्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत प्रतिहल्ले सुरू केले. या संघर्षादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच इराणचे अनेक उच्च अधिकारी आणि मंत्र्यांचा खात्मा केल्याचा दावा इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, इराणने आखाती देशांतील अमेरिकेच्या काही लष्करी तळांवर हल्ले करून मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे. आज अमेरिकेने जाहीर केले की, इराणी हल्ल्यांमध्ये त्यांच्या सैन्य दलातील चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, इस्त्रायलने दिलेल्या माहितीनुसार इराणकडून सतत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा होत असून देशभरात हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यासाठी सायरन वाजत आहेत.

इराणचे हल्ले सुरू असतानाच शेजारी देश लेबनॉनमधूनही इस्त्रायलवर हल्ले करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर देताना इस्त्रायलने बेरूतमध्ये अचूक कारवाई करत हिजबुल्लाहच्या गुप्तचर मुख्यालयाचे प्रमुख हुसेन मकलेड यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे.

महिला सैनिकांवर जबाबदारी

या पार्श्वभूमीवर इस्त्रायलने ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ अंतर्गत इराणवरील हवाई हल्ल्यांची माहिती दिली. या मोहिमेत पायलट आणि नेव्हिगेटर्ससह सुमारे ३० महिला एअरक्रू सदस्य सहभागी असल्याचे सांगण्यात आले. युद्धात महिला सैनिकांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे इस्रायली संरक्षण दलाने स्पष्ट केले.

दरम्यान, इराणकडून प्रदेशातील लष्करी आणि नागरी ठिकाणांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप अमेरिकन लष्कराने केला असून या धोक्याचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.