Israel launches Operation Wings of Dawn to migrate Manipur Bnei Menashe community: पश्चिम आशियात इस्रायल इराण आणि लेबनॉन या देशांशी लढत असतानाच त्यांनी भारतातही एक मोठी मोहीम राबवली आहे. इराणपासून ४,००० किमी दूर असलेल्या ईशान्य भारतात इस्रायल ‘ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन’ या नावाने मोहीम राबवत आहे. मणिपूरमधील बने मेनाशे समुदायाच्या सुमारे ५,००० सदस्यांना तेल अवीव येथे स्थलांतरित करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. इस्रायलकडून एवढी मोठी मोहीम हाती घेण्याचे कारण काय? बने मेनाशे या जमातीचा इस्रायलशी संबंध काय? बने मेनाशे म्हणजे नेमके कोण? याचा आढावा या लेखातून घेऊ.
इंडिया टुडे या संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. बायबलमधील श्रद्धेनुसार इस्रायलच्या हरवलेल्या १० जमातींपैकी एक असलेली बने मेनाशे जमात ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात विखुरलेली आहे. मणिपूर राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कुकी आणि मैतेई समुदायामध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. आता एका अशांत प्रदेशातून (मणिपूर) दुसऱ्या अशांत प्रदेशात (इस्रायल) बने मेनाशे जमात प्रवास करणार आहे. हजारो वर्षांपूर्वी स्थलांतर करावे लागणाऱ्या जमातीला आता हे अखेरचे स्थलांतर करावे लागत आहे.
इस्रायली सरकारने गुरुवारी जमातीच्या २५० जणांच्या पहिल्या तुकडीला दिल्लीहून विमानाने इस्रायलला नेले. मागच्या वर्षी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी भारतातील बने मेनाशे जमातीच्या ४,६०० सदस्यांच्या स्थलांतरासाठी निधी देण्याच्या मोहिमेची घोषणा केली होती. यापूर्वी दोन दशकांत सुमारे ५,००० लोकांनी आधीच इस्रायलमध्ये स्थलांतर केले आहे. इस्रायलचे स्थलांतर मंत्री ओफिर सोफर यांनी एएफपीशी बोलताना सांगितले की, दरवर्षी १,२०० लोकांना स्थलांतरीत करण्याची ही मोहीम आता सुरू झाली असून पुढील काही वर्षात संपूर्ण जमातीला इस्रायलमध्ये स्थलांतरित केले जाईल.

बने मेनाशे कोण आहेत?
पश्चिम आशियात इस्रायल अनेक आघाड्यांवर लढत असताना त्यांना भारतातून हजारो लोक विमानाने इस्रायलमध्ये नेण्याची गरज का भासली? असा प्रश्न पडू शकतो. तसेच ज्या बने मेनाशे जमातीसाठी इस्रायलने एवढी मोठी तयारी चालवली आहे, ते इतके का महत्त्वाचे आहेत? याची उत्तरे हवी असतील तर आपल्याला इस्रायलची निर्मिती त्याआधी ज्यूंच्या विस्थापनाचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.
बायबलमधील मजकूरानुसार, इस्रायलमधील प्राचीन लोक १२ जमातीमध्ये विभागले गेले आणि ते जगाच्या विविध कोपऱ्यात विखुरले गेले. यापैकी १० जमातींना जेकबच्या मुलांच्या नावांवरून नावे देण्यात आली. तर दोन जमातींची नावे त्यांचे नातू जोसेफचे पुत्र एफ्राइम आणि मेनाशे यांच्या नावावरून ठेवण्यात आली.
बने मेनाशे जमात हे स्वतःला मेनाशे यांचे वंशज मानते. इ.स.पूर्व ७२२ मध्ये असीरियन विजेत्यांनी इस्रायलचा पराभव केल्यानंतर त्यांना हद्दपार केले होते. पर्शिया, अफगाणिस्तान, तिबेट आणि चीनमधून शतकानुशतके स्थलांतरानंतर या जमातीचे सुमारे १०,००० सदस्य भारताच्या ईशान्य भागात पोहोचले. बहुसंख्य सदस्य मणिपूर आणि मिझोरामच्या भागात स्थायिक झाले.
बने मेनाशेचा अर्थ काय?
आयआयटी दिल्लीचे समाजशास्त्राचे संशोधक असफ रेंथलेई यांनी इंडिया टुडेशी बोलताना बने मेनाशे या शब्दाचा अर्थ उलगडला आणि या जमातीच्या मुळाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “बने म्हणजे मुले आणि मेनाशे म्हणजे नातू”
बने मेनाशे किंवा इतर ज्यूंच्या जमाती भारतात आल्या, त्या इथे शेकडो वर्ष राहिल्या. जगातील इतर कोणत्याही देशांपेक्षा त्यांना भारतात सर्वात सुरक्षित वाटले. इतर देशांच्या तुलनेत भारतात त्यांना कधीही धार्मिक छळाचा सामना करावा लागला नाही.
मणिपूरमध्ये बने मेनाशे जमातीला कुकी समाजात गणले जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन मिशनरींच्या प्रभावाखाली कुकी समाजातील अनेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण बने मेनाशे जमात मात्र ज्यू धर्माच्या चालीरीती जोपासत आणि प्रथा जोपासत आले.

आताच इस्रायलला स्थलांतरित होण्याचे कारण काय?
धर्म, हे इस्रायलला स्थलांतरित होण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. मणिपूरमधील रहिवाशी बेंजामिन हाओकिप यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितले की, मणिपूरच्या डोंगराळ भागात धार्मिक विधी करताना खूप अडचणी निर्माण होतात. इथे आम्हाला आमच्या धार्मिक प्रथा पार पाडण्यात भौगोलिक अडचणी येतात. प्रार्थना विधी पार पाडण्यासाठी मिन्यान किंवा गणसंख्या होणे आवश्यक असते. मात्र येथील अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे हे शक्य होत नाही. आम्हाला आमचा धर्म जोपासण्यासाठी इस्रायलला जायचे आहे.
मिन्यान हा हिब्रू शब्द असून याचा अर्थ १० प्रौढ ज्यूंचा संच. धार्मिक प्रार्थनेसाठी ही गणसंख्या असावी लागते, अशी मान्यता आहे.
इस्रायलला हे स्थलांतर का हवे आहे?
बने मेनाशे जमातीच्या स्थलांतराचा उपक्रम हा एक महत्त्वाचा झायोनिस्ट निर्णय असल्याचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले होते. २००५ पासून स्थलांतरीत झालेले जमातीचे लोक गाझामधील संकुलात आणि लेबनॉनमध्ये ज्या भागात हल्ले केले, तिथे स्थायिक झाले आहेत.

मागच्या दोन ते तीन वर्षांपासून इस्रायलचा गाझामध्ये हमासशी संघर्ष चालू आहे. तसेच आता इराण विरोधात युद्ध सुरू असल्यामुळे इस्रायलला कामगारांचा तुटवडा भासत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने केलेला भीषण हल्ला आणि त्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामुळे इस्रायलमधील कामगारांची संख्या कमी झाली. नेपाळ, थायलंडमधील स्थलांतरित कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे इस्रायलच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला.
बने मेनाशे जमातीच्या स्थलांतरामुळे इस्रायलला मनुष्यबळाची कमतरता भरून काढता येईल, असे सांगितले जाते. स्थलांतरित समुदायाला गॅलिलीसारख्या सीमावर्ती भागांमध्ये स्थायिक करण्याचा इस्रायली सरकारचा विचार आहे. याकडे अरब-इस्रायली लोकसंख्येचा समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे.
बने मेनाशे जमातीसाठीही स्थलांतर आर्थिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे. मणिपूरमध्ये जमातीमधील बरेचसे लोक शेतात किंवा इतर ठिकाणी मजुरी करतात. जे इस्रायलमध्ये स्थलांतरित होत आहेत, ते तिथे जाऊन ट्रक चालविणे किंवा बांधकाम मजूर म्हणून काम करतात. भारतात जर त्यांना अंदाजे १,२०० डॉलर मिळत असतील तर इस्रायलमध्ये ते जवळपास ५५,००० डॉलरपर्यंत कमाई करतात, असा अंदाज इंडिया टुडेच्या लेखात व्यक्त केला आहे. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या वांशिक गटात हिंसाचार उसळला. त्यामुळे जमातीच्या लोकांचा रोजगारही काही काळासाठी हिरावला गेला. अशापरिस्थितीत इस्रायलला जाण्याचा निर्णय दोहोंसाठी लाभदायक आहे.
