Israel has confirmed the elimination of Asghar Bagheri : इराण-इस्रायल संघर्षात मोठी वाढ झाली असून, इस्रायली लष्कराने इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या ‘कुड्स फोर्स’ या गुप्तचर युनिटच्या प्रमुखाला ठार केल्याचा दावा केला आहे. अल जझीराने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असगर बाकेरी यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
बाकेरी हे इस्रायल आणि अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले करण्याची योजना आखण्यात, तसेच इस्रायल, सीरिया आणि लेबनॉनमधील कारवायांमध्ये सामील होते, असे शोशानी यांनी सांगितले. इराणने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कुड्स फोर्स म्हणजे काय?
‘कुड्स’ हे जेरुसलेमचे अरबी नाव आहे. कुड्स फोर्स हे अपारंपरिक युद्ध आणि गुप्तचर कारवायांसाठी ओळखले जाणारे एक विशेष युनिट आहे. हे युनिट इराणबाहेरील सशस्त्र गटांना प्रशिक्षण, निधी आणि पाठबळ देण्याचे काम करते. हे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) अंतर्गत काम करते. याची स्थापना १९७९ च्या इराणी क्रांतीनंतर करण्यात आली होती. कुड्स फोर्सचे लेबनॉनमधील हिजबुल्ला, इराकमधील शिया मिलिशिया आणि पॅलेस्टिनी भागातील सशस्त्र गटांशी जवळचे संबंध आहेत.
IRGC चे गुप्तचर प्रमुखांचाही खात्मा
याआधी, तेहरानमध्ये झालेल्या एका इस्रायली हवाई हल्ल्यात IRGC चे गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांचाही मृत्यू झाला. खादेमी यांनी २०२५ मध्ये हे पद स्वीकारले होते. या युद्धात आतापर्यंत इराणचे माजी सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी आणि माजी गुप्तचर मंत्री इस्माईल खातिब यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
साउथ पार्सवरील हल्ल्यात २५ हून अधिकांचा मृत्यू
युद्धाच्या ३८ व्या दिवशी, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये तेहरानमध्ये २५ हून अधिक लोक मारले गेले आहेत. यामध्ये ‘साउथ पार्स’ या नैसर्गिक वायू क्षेत्रावरही हल्ला करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि शेजारील आखाती देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
