Israel launched attack on Tehran: अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असताना शनिवारी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केला. असोसिएटेड प्रेस (एपी) वृत्तानुसार, इराणची राजधानी तेहरानमध्ये शनिवारी मोठा स्फोट झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा केली.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. ८६ वर्षीय खामेनी यावेळी त्यांच्या कार्यालयात होते की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला असून पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलकडून हा हल्ला झाला आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले की, इराणकडून निर्माण झालेल्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. इस्रायलला धोका वाटत असल्यामुळे हा आगाऊ हल्ला करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेशी समन्वय साधून सदर हल्ला केल्याचेही इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जूनमधील हल्ल्यानंतर पुन्हा संघर्ष

जून २०२५ मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात १२ दिवसांचा सशस्त्र संघर्ष उडाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा दोन देश आमनेसामने आले आहेत. दीर्घकाळापासून या दोन देशांत थेट संघर्ष होत आहे. इराणच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र निर्मितीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा दबाव वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये यासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या.

ही बातमी अपडेट होत आहे….