Israel Airstrikes in Gaza: आगीच्या फुग्यांना फायटर जेट्सने दिलं उत्तर; सत्तांतरणाच्या तिसऱ्या दिवशीच गाझा पट्टीत हल्ला

मागील महिन्यामध्ये २१ तारखेला दोन्ही बाजूकडून शस्त्रसंधीसंदर्भात एकमत झाल्यानंतर आता या हवाई हल्ल्यांमुळे पुन्हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता

Israel airstrikes in Gaza, Israel attack Gaza, israel vs palestine
यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट पंतप्रधान झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गाझा पट्टीमध्ये करण्यात आला हल्ला. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य रॉयटर्स)

पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये आग लावण्यात आलेले मोठ्या आकाराचे फुगे पाठवल्यानंतर इस्रायलच्या हवाईदलाने बुधवारी गाझा पट्टीमध्ये हवाई हल्ले सुरु केले आहेत. पोलीस आणि इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हे आग लावलेले फुगे पाठवण्यात आल्याने गाझा आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला असतानाही हल्ले करण्यात आलेत. मागील महिन्यामध्ये २१ तारखेला (२१ मे २०२१ रोजी) दोन्ही बाजूकडून शस्त्रसंधीसंदर्भात एकमत झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा या हवाई हल्ल्यांमुळे संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.

पॅलेस्टाईनमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हवाईदलाने गाझा शहराच्या दक्षिणेतील खान यूनुसच्या पूर्वेकडील एका ठिकाणावर हल्ला केला. खान यूनुसमधील एएफपीच्या एका छायाचित्रकाराने हे बॉम्ब हल्ले स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेत. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने दिलेल्या माहितीनुसार आग लावलेल्या फुग्यांचं उत्तर देण्यासाठी लढाऊ विमानांनी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना असणाऱ्या हमासच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला.

कुठे केला हल्ला?

इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने जारी केलेल्या माहितीनुसार, “खान यूनुसमधील दहशतवाद्यांची बैठक आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.”

सत्तांतराच्या तिसऱ्या दिवशी एअर स्ट्राइक

सलग १२ वर्षे इस्रायलच्या पंतप्रधानपदी राहिलेले बिन्यामिन नेतान्याहू यांना अखेर सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. इस्रायलच्या संसदेने रविवारी यामिना पक्षाचे प्रमुख नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला कौल दिला. नव्याने सत्तेत आलेल्या बेनेट सरकारने सत्तांतरण झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये गाझावर पहिला एअर स्ट्राइक केला. पॅलेस्टाईनमधून पाठवण्यात आलेल्या आगीच्या फुग्यांमुळे दक्षिण इस्रायलमध्ये २० ठिकाणी आग लागण्याची घटना घडल्याची माहिती इस्रायलच्या अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बेनेट झाले पंतप्रधान…
रविवारी बेनेट यांच्या बाजूने संसदेने कौल दिल्यानंतर त्यांनी त्याच दिवशी पदभार स्वीकारला. उजवे, डावे व मध्यममार्गी पक्ष, तसेच एक अरब पक्ष अशा वैचारिकदृष्टय़ा भिन्न राजकीय पक्षांची अभूतपूर्व आघाडी असलेल्या या नव्या सरकारकडे निसटते बहुमत आहे. ६० विरुद्ध ५९ अशा केवळ एका मताने नव्या आघाडीने विजय मिळवला.

गदारोळ आणि भाषण

बेनेट यांनी रविवारी क्नेसेटमध्ये (इस्रायली संसद) त्यांच्या नव्या सरकारमधील मंत्र्यांचा परिचय करून दिला. नेतान्याहू यांच्या समर्थकांनी त्यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले. विरोधी पक्षांच्या सदस्यांचा अखंड गोंधळ सुरू असतानाच, बेनेट यांनी भाषणात नव्या आघाडीच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली. निरनिराळ्या मतांच्या नेत्यांसोबत आपण ही आघाडी तयार केली असून, या आघाडीबाबत आपल्याला अभिमान आहे. या निर्णायक क्षणी आम्ही जबाबदारी घेतली आहे. या देशाला आणखी विभाजित होऊ द्यायचे नाही, यासाठी असा निर्णय घ्यावा लागला, असे बेनेट म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Israel launches airstrikes in gaza scsg