वृत्तसंस्था, बेरूत

नबी चिट या पर्वतीय शहरात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान १६ जण ठार आणि ३५ जण जखमी झाल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी शनिवारी सांगितले. इराणसमर्थित हेजबोलाने सांगितले की, त्यांच्या शुक्रवारी रात्री उशिरा पूर्व लेबनॉनच्या पर्वतांमध्ये इस्रायली सैन्यांबरोबर चकमक झाली. इस्रायलने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, इस्रायली युद्धविमानांनी तेहरानमध्येही जोरदार हल्ले केले.

कुवेतचा तेल उत्पादनात कपातीचा निर्णय

मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कुवेतने तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ने या परिस्थितीला इराणने केलेले हल्ले आणि ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’ला असलेला धोका कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. या सामुद्रधुनीतून जगातील एकूण तेल व्यापाराचा एक पंचमांश हिस्सा जातो. कुवेतने उत्पादनात नेमकी किती कपात केली आहे हे स्पष्ट केलेले नाही, परंतु शनिवारच्या या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात गोंधळाची शक्यता आहे.