Israel Lebanon Ceasefire: इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असताना एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. इस्रायल आणि लेबनॉनने १० दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री याबाबत जाहीर केले. लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या “अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर” हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. शांतता चर्चेसाठी नेतान्याहू आणि औन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करणार असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पहाटे ३:३० वाजल्यापासून सुरु होणार युद्धविराम

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्धविराम ईएसटी वेळेनुसार दुपारी ५ वाजता (भारतीय वेळेनुसार पहाटे ३:३० वा.) सुरू होईल. दोन्ही देशांमधील शांतता प्रक्रियेच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. “जगातील ९ युद्धे थांबवण्याचा बहुमान मला मिळाला आहे आणि हे माझे १० वे यश असेल, चला तर मग, हे पूर्ण करूया,” असे मोठ्या आत्मविश्वासाने ट्रम्प यांनी पोस्ट केले आहे.

अमेरिकेत झाली बैठक – ट्रम्प

याशिवाय ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींसोबत महत्वाची बैठक झाल्याचे देखील सांगितले. इस्रायल आणि लेबनॉनच्या प्रतिनिधींची या आठवड्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये बैठक झाली. गेल्या ३४ वर्षांतील या दोन देशांमधील ही पहिलीच अशा प्रकारची भेट होती, असे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली, असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

इस्रायल – हेजबोल्लाकडून दुजोरा नाही

दरम्यान, इस्रायल किंवा या संघर्षात थेट सामील असलेल्या हेजबोल्लाकडून याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. पण, ट्रम्प यांच्या विधानावरून पडद्याआड सुरू असलेल्या राजनैतिक हालचालींना वेग आल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इस्रायलने शस्त्रसंधीची घोषणा केली होती पण, काही वेळाच युटर्न घेऊन पुन्हा लेबनॉनवर हल्ले केले होते. या हल्लांमध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक रहिवासी भागात पडझड झाल्याचे दिसून आले होते. इस्रायलने मात्र हेजबोल्लाच्या तळांवर हल्ला केल्याचा दावा केला होता.