Israel Lebanon Ceasefire news : इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने युद्धविराम स्वीकारल्याचे जाहीर केले असून, शुक्रवारी पाकिस्तानमध्ये अमेरिकेसोबत चर्चा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. इराणने १० कलमी प्रस्ताव मांडला असून तो अमेरिकेने मान्य केला. तसंच, इस्रायलनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. असे असले तरीही या प्रस्तावात लेबनॉनमधील हेजबोलाचा समावेश नसल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलंय. एपी या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इस्रायलचा पाठिंबा
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “इराणने तातडीने होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली करावी आणि अमेरिका, इस्रायलसह या क्षेत्रातील इतर देशांवरील सर्व हल्ले थांबवावेत, या अटीवर ट्रम्प प्रशासनाने हल्ले स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे.”
याशिवाय, इराणकडून निर्माण होणारा आण्विक आणि क्षेपणास्त्र धोका कायमचा संपवण्यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांनाही इस्रायलने पूर्ण पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या मध्यस्थीने होणाऱ्या या करारानुसार इस्रायल आणि हेजबोला यांनी लेबनॉनमधील युद्ध थांबवावे, असे आवाहन करण्यात आले असले तरी, नेतन्याहू यांच्या विधानामुळे हेजबोलाविरुद्धची लष्करी कारवाई तूर्तास थांबण्याची शक्यता धूसर दिसत आहे.
इराणने अमेरिकेवर काय अटी घातल्या?
- अहिंसेप्रती कटिबद्धता
- होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार
- युरेनियम संवर्धनास परवानगी
- सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
- सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
- गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
- इराणला नुकसानभरपाई देणं
- पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
- लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम
या १० कलमी प्रस्तावानंतर इराण आणि अमेरिकेत यांच्यात युद्धविरामाचा करार झाला.
