रॉयटर्स, दुबई / बैरुत
अमेरिका आणि इराणमध्ये जाहीर झालेला युद्धविराम इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यांमुळे पुन्हा धोक्यात आला होता. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी लेबनॉनशी शक्य तितक्या लवकर थेट चर्चेला परवानगी दिल्याचे जाहीर केले आहे. यामुळे अमेरिका-इराण यांच्यात शुक्रवारी पाकिस्तानमध्ये होणार्या शस्त्रसंधीतील अडथळा दूर झाला आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या युद्धविरामामध्ये लेबनॉनचा समावेश नव्हता, असे इस्रायल आणि अमेरिकेचे म्हणणे होते. तर इराण आणि मध्यस्थ पाकिस्तानने लेबनॉन या कराराचाच भाग असल्याचे म्हटले आहे. ब्रिटन, फ्रान्ससह अनेक देशांनी लेबनॉनचा समावेश युद्धविरामामध्ये करण्यात यावा, असे म्हटले आहे. या दबावानंतर इस्रायलने एक पाऊल मागे घेतले. लेबनॉनच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून चर्चेचा आदेश दिल्याचे नेतान्याहून यांनी स्पष्ट केले. हेजबोलाला नि:शस्त्र करणे आणि शेजारी देशांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे यावर चर्चेत भर दिला जाईल त्यांनी नमूद केले. ही चर्चा वॉशिंग्टन येथे पुढील आठवड्यात होईल असे सूत्रांनी स्पष्ट केले.
अमेरिकेकडून लेबनॉनमधील अमेरिकेचे राजदूत मिशेल इस्सा आणि इस्रायलतर्फे अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत येखिएल लेटर सहभागी होतील. लेबनॉनकडून कोण सहभागी होणार हे स्पष्ट झाले नाही. लेबनॉनचा समावेश युद्धविरामासंदर्भात करारामध्ये करण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना इराणचे १० सदस्यांचे शिष्टमंडळ अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल होत आहे. अमेरिकेचे शिष्टमंडळ उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये येणार आहे. ‘इस्रायल सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याने इराणच्या जनतेमध्ये संशयाची भावना आहे. असे असले, तरी इराणचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाकिस्तानमध्ये येणार आहे,’ अशी टिप्पणी इराणचे पाकिस्तानमधील राजदूत रेझा आमिरी मोघदम यांनी दिली.
खामेनी यांना श्रद्धांजली
युद्ध थांबल्यानंतर तेहरानमध्ये दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. खामेनी आणि त्यांच्या मुलाचे फलक नागरिकांच्या हातात होते.
अन्य घडामोडी
– इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यांबाबत ब्रिटन आणि फ्रान्सकडून गंभीर चिंता
– युद्धादरम्यान इराणला सहकार्य केल्याच्या वृत्ताचे चीनकडून खंडन
– आम्हाला गरज होती, तेव्हा नेटो देश आले नाहीत – ट्रम्प यांचा नेटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांच्याकडे तक्रारीचा सूर
तीनशे जण ठार : इस्रायलच्या हल्ल्यात बुधवारपासून ३०० जण ठार झाल्याचे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. हेजबोलाचा सरचिटणीस नईम कासीम याच्या भाच्याला ठार केल्याचा दावा इस्रालयच्या लष्कराने केला आहे. या हल्ल्यांमुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंदच ठेवली असून, अमेरिकेनेही हल्ला करण्याच्या धमक्यांची भाषा सुरूच ठेवली आहे.
ट्रम्प यांची पुन्हा धमकी इराणने सहकार्य केले नाही, तर हल्ल्यांना पुन्हा सुरुवात होईल आणि ते इतके तीव्र असतील, की यापूर्वी असे हल्ले कुणीही पाहिले नसतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. सध्याच्या काळात आमचे लष्कर पुढच्या विजयासाठी विश्रांती घेत आहे असे त्यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केले.
