वृत्तसंस्था, कैरो
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात १० दिवसांचा शस्त्रसंधी झाल्याची घोषणा अमेेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. अनेक दशकांनंतर वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच थेट चर्चा झाली होती. अमेरिका व इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये होणार्या प्रस्तावित शांतता चर्चेसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
लेबनॉनमध्ये इस्रायल आणि इराण समर्थित हेझबोला या दहशतवादी गटात महिनाभरापेक्षा जास्त काळ संघर्ष सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू आणि लेबनॉनचे अध्यक्ष जोफे औन यांच्याशी उत्तम चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केले. उच्चस्तरीय बैठकीसाठी ट्रम्प यांनी या दोन्ही देशाच्या प्रमुखांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी तेहरानमध्ये इराणी पार्लमेंटचे सभापती मोहम्मद बघेर घालीबाफ यांच्याशी चर्चा केली. इस्रायल-अमेरिकाविरुद्ध इराण यांच्यातील युद्धसमाप्तीसाठी मध्यस्थ म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे.
