Israel Lebanon Direct Talks in Washington : इस्रायल आणि लेबनॉन यांनी बुधवारी दहशतवादी गट हेजबोलाबरोबरचे शत्रुत्व संपवण्यासाठी परस्पर संमतीने ठरलेल्या ठिकाणी आणि वेळी थेट वाटाघाटी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

      खामेनी यांच्या हत्येनंतर संघर्ष झाला होता तीव्र

      अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर, २ मार्च रोजी हेजबोलाने इस्रायलवर रॉकेट डागले होते. परिणामी पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र झाला. पण आता संघर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. या चर्चेत मध्यस्थी करणारे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले की, “इराणी हेजबोलाचा प्रभाव संपवण्याची ही एक ऐतिहासिक संधी आहे.” इस्रायलने सर्व गैर-राज्य दहशतवादी गटांचे नि:शस्त्रीकरण करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बीबीसीने म्हटलं आहे.

      दरम्यान, फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध संपत आले आहे असे विधान केले आहे. इस्रायल आणि हेजबोला यांच्यातील या समांतर युद्धामुळे पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांत अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण इराणच्या १० कलमी प्रस्तावात लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध थांबवण्याची अट समाविष्ट होती.

      गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर, तेल अवीवने (इस्रायल) हेजबोलाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली. या घोषणेपूर्वी, लेबनॉनमधील इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांत १,५०० हून अधिक लोक मारले गेले होते.

      आता हा मृत्यूचा आकडा २,१०० च्या पुढे गेला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, मृतांमध्ये १,७०२ पुरुष, २५४ महिला आणि १६८ मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये डझनभर आरोग्य कर्मचारी मारले गेल्याने आणि अनेक जण जखमी झाल्याने युरोपियन, पश्चिम आशियाई देश आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीकडून तीव्र टीका केली जात आहे.