जेरुसलेम : इस्रायलने लेबनॉनमधील कथित बफर क्षेत्रापलीकडील सात गावे रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. शनिवारी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींचा दौरा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर इस्रायलने लगेचच दक्षिण लेबनॉनवर हल्ले सुरू केले. त्यापाठोपाठ रविवारी सात गावांतील लोकांना निघून जाण्यास सांगितले. ही गावे लितानी नदीच्या उत्तरेला असून तिथपर्यंत आपली सीमा असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या भूमिकेमुळे इस्रायल आता लेबनॉनवर पुन्हा आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

लेबनॉन आणि इस्रायलदरम्यान १० दिवसांचा शस्त्रसंधी सुरू असून त्याची मुदत सोमवारी संपते. त्यानंतर या शस्त्रसंधीची मुदत आणखी तीन आठवडे वाढवली असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. मात्र, या शस्त्रसंधीदरम्यान इस्रायलचे हल्ले पूर्णपणे थांबलेले नाहीत. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये २,५००पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २७४ महिला आणि १७७ लहान मुलांचा समावेश आहे.