US warns Iran: काही दिवसांपूर्वी पृथ्वीवरुन नाहीसे करायला निघालेल्या इराणला अमेरिकेने आता इस्रायलकडून संभाव्य धोक्याविरोधात सावध केले आहे. अमेरिकेबरोबर संघर्ष समाप्त करण्यासाठी होणाऱ्या वाटाघाटीदरम्यान इराणकडून भूमिका मांडणाऱ्या दोघा वरिष्ठ नेत्यांची इस्रायल हत्या करण्याचा प्रयत्न करु शकते, अशी पूर्वसूचना अमेरिकी अधिकाऱ्यांनी इराणला दिली आहे. अमेरिकेच्या आजी-माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वॉशिंगटन पोस्टने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यू यॉर्क टाईम्सने देखील याबाबतचे वृत्त पूर्वी प्रसिद्ध केले होते.

अराघची आणि गालिबाफ यांच्या हत्येचा कट?

अमेरिकेबरोबर युद्ध समाप्त करण्यासाठी सांमजस्य करार झाल्यानंतर ६० दिवसांच्या कालावधीत उभय देशातील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. यासाठी इराणकडून परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ बाजू मांडत आहेत. दरम्यान, इस्रायल अराघची आणि बाघेर गालिबाफ यांची हत्या करु शकते अशी गुप्त माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी इराणला दिल्याचे ‘वॉशिंगटन पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी असा प्रयत्न झाल्याचेही अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटले असून, इराणी मध्यस्थांची हत्या झाल्यास चर्चा थांबू शकते आणि संघर्ष पुन्हा सुरु होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेला भीती

“तुम्ही त्यांना ठार करताय म्हणजे, मध्यस्थींची हत्या करताय”, अशी माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी ‘वॉशिंगटन पोस्ट’शी बोलताना दिली. वृत्तात पुढे दिलेल्या माहितीनुसार, नेत्यांच्या हत्येच्या भीतीपोटी अमेरिकेने इराणला सतर्क राहण्याची सूचना केली आहे. संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याने मध्यस्थींची हत्या होण्याची भीती अमेरिकेला देखील सतावत आहे. दरम्यान, वाटाघाटी सुरु असताना इराणवर हल्ला न करण्याची विनंती अमेरिकेने इस्रायला यापूर्वीच केली आहे.

अमेरिका – इस्रायलमध्ये मतभेद

“शांतता करार व्यवस्थित पार पडावा अशी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे”, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून ‘वॉशिंगटन पोस्ट’ला देण्यात आली आहे. दरम्यान, यावर इस्रायलकडून अद्याप अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. इराणविरोधात एकत्र युद्ध पुकारलेल्या अमेरिका आणि इस्रायलमध्ये मतभेद वाढत असल्याचेही या वृत्तात पुढे म्हटले आहे. अलिकडे अमेरिकेने इराणविरुद्ध चर्चेतून तोडगा काढण्यावर भर दिला आहे.

लारीजानी यांच्या हत्तेचे निमित्त

इस्रायलने इराणचे राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांची हत्या केल्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेत मतभेद वाढल्याचा दावा वॉशिंगटन पोस्टच्या वृत्तात करण्यात आला आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येमुळे नाही पण लारीजानी यांच्या हत्येनंतर इस्रायल आणि अमेरिकेतील मतभेद वाढले. अमेरिका लाराजानी यांच्याशी चर्चेसाठी प्रयत्नशील असताना त्यांची हत्या झाली, असे वृत्तात पुढे म्हटले आहे. दरम्यान, त्यानंतर आता अराघची आणि गालिबाफ यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. न्यू यॉर्क टाईम्सने देखील इस्रायल अराघची आणि गालिबाफ यांच्या हत्येचा प्रयत्न करु शकते असे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

यापूर्वी देखील गालिबाफ यांच्या हत्येचा प्रयत्न

इस्लामाबाद येथून १२ एप्रिल रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी व्हास यांच्याशी चर्चा करुन माघारी येत असताना गालिबाफ यांना संभाव्य हत्येच्या कटापासून सावध करण्यात आले होते. इस्रायल गालिबाफ यांच्या विमानावर हल्ला करु शकते असा इशारा देण्यात आल्यानंतर त्यांनी वाहनांना तेहरानपर्यंत प्रवास केला होता, असे न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. अराघची आणि गालिबाफ यांची हत्या झाल्यास पुन्हा एकदा संघर्ष उफाळेल अशी भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे.