इस्रायलमध्ये ‘एनएसओ’च्या कार्यालयांची झाडाझडती

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे अधिकारी संरक्षण विभागाच्या निर्यात नियंत्रण विभागाचे आणि राष्ट्रीय संरक्षण परिषदेचे आहेत.

पेगॅसस पाळत प्रकरणाच्या तपासाला आरंभ

पेगॅसस पाळत प्रकरणात इस्राायल सरकारने चौकशी सुरू केली आहे. एनएसओ समूहाच्या कार्यालयांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. या कंपनीच्या स्पायवेअरचा अनेक देशांच्या सरकारांनी गैरवापर केल्याचा आरोप होत असून त्याचे जगभरात पडसाद उमटत आहेत.

इस्रायलच्या संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, अनेक विभागांचे अधिकारी एनएसओ कंपनीच्या कार्यालयांत तपासणी करीत आहेत. पेगॅसस पाळतीबाबत ही चौकशी केली जात आहे. या तपासाबाबत अधिक काही सांगण्यास प्रवक्त्यांनी नकार दिला.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे अधिकारी संरक्षण विभागाच्या निर्यात नियंत्रण विभागाचे आणि राष्ट्रीय संरक्षण परिषदेचे आहेत. गरज भासल्यास त्यांना तपास करण्याचा अधिकार आहे.

इस्रायलच्या संरक्षण खात्याने एनएसओ या कंपनीला दिलेल्या परवान्यातील शर्ती आणि अधिकार यांनुसारच कंपनीने पेर्गसस प्रकरणात कृती केली आहे की नाही, यावर हा तपास केंद्रीत करण्यात आला आहे.

एनएसओ समुहाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मक्र्युरी पब्लिक अफेयर्सने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘इस्रायलच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली, याला दुजोरा देता येईल. आम्ही त्यांच्या तपासणीचे स्वागतच करतो. ’’ इस्रायलच्या अधिकाऱ्यांना कंपनी पारदर्शकपणे संपूर्ण सहकार्य करीत आहे. नुकचेच माध्यमांतून जे आरोप करण्यात आले, त्यांबाबत कंपनीने जी वस्तुस्थिती मांडली, तीच या तपासातून सिद्ध होईल,   असेही या निवेदनात म्हटले आहे.

अधिकृत परवानगी कशासाठी?

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्राँ यांच्यावरही पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात आल्याची तक्रार आहे. त्यांनी इस्रायलकडे आक्षेप नोंदवून याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली होती. त्यावर इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गॅन्ट्झ यांनी बुधवारी पॅरिसमध्ये फ्रान्सचे समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली यांच्याकडे बाजू मांडली. इस्राायलमधून केवळ अन्य देशांच्या सरकारांना सायबर उत्पादने पुरविण्यास कंपन्यांना परवानगी आहे. ही परवानगी केवळ कायदेशीर वापर आणि गुन्हे रोखणे, त्यांचा तपास आणि दहशतवादविरोधी उपाययोजनांसाठी आहे, असे स्पष्ट करण्यात आल्याचे इस्रायली संरक्षणमंत्र्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Israel nso office bushes pegasus case akp