Israel Pakistan Conflict News: Verbal spat erupts between Khawaja Asif and Benjamin Netanyahu over Iran peace talks : अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने आजपासून इस्लामाबाद येथे शांतता चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि पाकिस्तान आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलवर लेबनॉनमध्ये ‘नरसंहार’ केल्याचा आरोप केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

इस्रायल पंतप्रधानांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर पोस्ट करत आसिफ यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत, त्यांचे विधान संतापजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच इस्रायलचा विनाश करण्याचे आवाहन खपवून घेतले जाणार नाही, विशेषतः अशा देशाकडून जो शांततेच्या चर्चेमध्ये स्वत:ला निष्पक्ष मध्यस्थ म्हणून पुढे करत आहे, असेही इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

“हे असे विधान नाही जे कोणत्याही सरकारकडून करण्यात आले तरी खपवून घेतले जाऊ शकेल, विशेषतः अशा सरकारकडून जे शांततेसाठी निष्पक्ष मध्यस्थ असल्याचा दावा करते,” असे निवेदनात म्हटले आहे.

आसिफ यांच्या विधानावर टीका

आसिफ यांनी इस्रायलवर आगपाखड करणाऱ्या काही काही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केल्या होत्या, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शा‍ब्दिक वाद पेटल्याचे दिसत आहे. आसिफ यांनी इस्रायल हा देश ‘दुष्ट आणि मानवतेसाठी शाप’ असून, इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरू असतानाही ‘लेबनॉनमध्ये नरसंहार केला जात आहे’ असा आरोप केला आहे. इस्रायलकडून पहिल्यांदा गाझा, नंतर इराण आणि आता लेबनॉननध्ये निष्पाप लोकांची हत्या केली जात आहे, रक्तपात अखंडपणे सुरूच आहे, असे आसिफ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

“ज्या लोकांनी युरोपियन ज्यूंपासून सुटका मिळवण्यासाठी पॅलेस्टिनी भूमीवर हा कर्करोगासारखा देश निर्माण केला, ते नरकात जळावेत अशी मी आशा आणि प्रार्थना करतो,” असेही ख्वाजा आसिफ म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

Khwaja Asif Post

पाकिस्तानाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह

पश्चिम आशियामध्ये पेटलेला संघार्षामध्ये पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आसिफ यांचे हे विधान आले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातली शांतता चर्चा इस्लामाबाद येथे होत आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या युद्धविराम घडवून आणण्याचे श्रेय हे पाकिस्तानला दिले जात आहे, यादरम्यान हा वाद निर्माण झाला आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी देखील इस्रायलचे हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला होता.

मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने इराणचे एक शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार आहे. मात्र इस्रायल आणि पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये झालेल्या या शा‍ब्दिक वादामुळे पाकिस्तानला या शांतता चर्चेत एक निष्पक्ष मध्यस्थ म्हणून आपली प्रतिमा कायम ठेवणे अवघड जाणार आहे.