इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या युद्धस्थिती टोकाला पोहोचली आहे. इस्रायलने गाझापट्टील हल्ल्याचा भडिमार केला आहे. त्यामुळे अनेक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी केलेल्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला. त्यात लहान मुलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील जाला टॉवर उद्ध्वस्त झाला आहे. या टॉवरमध्ये अल जझीरा आणि इतर आंतरराष्ट्रीय मीडियाचे कार्यालयं होती. इस्रायलने केलेल्या आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३९ लहान मुलांचा समावेश आहे. एक हजारापेक्षा अधिक जण जखमी झालेत. या घटनेची दखल मुस्लिम राष्ट्रांनी घेतली आहे.

इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटली आहेत. यासाठी सौदी अरेबियाने मुस्लिम देशातील परराष्ट्रमंत्र्यांची बैठक रविवारी बोलावली आहे. या बैठकीत इस्रायल पॅलेस्टाईनवर करत असलेल्या हल्ल्याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच जेरुसलेममध्ये इस्रायली पोलिसांकडून पॅलेस्टाईन नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मतं घेतली जाणार आहेत. त्यामुळे या बैठकी साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. या बैठकीत ५७ देशातील मंत्री सहभागी होतील असं सांगण्यात आलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतली जाणार आहे. सौदीत मुख्यालय असलेल्या ओआयसीमध्ये इराण, तुर्की, इंडोनेशिया आणि मुस्लिम बहुसंख्य देशांचा समावेश आहे.मक्का आणि मदीना येथील मशिदीनंतर अल अक्सा मशिद मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र मानली जाते. यासाठी ५१ वर्षांपूर्वी ओआयसीची स्थापना करण्यात आली होती.

‘चार दिवस झालेत झोप येत नाही’, इस्रायलमधील भारतीय परिचारिकेनं सांगितली आपबीती

पॅलेस्टाईन आणि इस्त्रायली सुरक्षा दलांमधील चकमक १० मेपासून जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत सुरू झाली. त्यात १२ पॅलेस्टिनी आंदोलक जखमी झाले होते. इस्रायलने पूर्व जेरुसलेममधील शेख जर्रा येथून पॅलेस्टाईन कुटुंबांना काढून टाकण्याच्या योजनेमुळे पॅलेस्टाईन लोकही संतप्त झाले. त्यामुळे पॅलेस्टाईनमधील अतिरेकी गटाने इस्रायलवर चढवला. त्यानंतर या युद्धाची ठिगणी पडली. आता अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटल्याने हे युद्ध आणखी पेटण्याची भीती व्यक्त होत आहे.

पहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं – सरसंघचालक मोहन भागवत

जेरुसलेम संघर्षाच्या केंद्रस्थानी

इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या सीमेजवळ असणारं जेरुसलेम हे वादाच्या केंद्रस्थानी आहे. शहराच्या मध्यभागी असणाऱ्या जुनं जेरुसलेममधील टेकडी जगभरातील ज्यू लोकांना टेम्पल माऊंट म्हणून ठाऊक आहे. ज्यू धर्मियांसाठी ही सर्वात पवित्र जागा आहे. तर मुस्लीमांसाठीही अल अक्सा मशीदीमुळे जुनं जेरुसलेम पवित्र धार्मिक स्थळांच्या यादीत तिसऱ्या स्थानी येतं. या ठिकाणी एकंदरीत मुस्लीम, ज्यू, ख्रिस्ती आणि अर्मेनिय अशा चार वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांसाठी महत्वाची अशी धार्मिक स्थळं आहेत. इस्रायल कायमच जेरुसलेम हा देशाचा अविभाज्य भाग असल्याच सांगत आलं आहे. इतकच नाही तर जेरुसलेम ही देशाची राजधानी असल्याचंही इस्रायल सांगतं. इस्रायलने पूर्व जेरुसलेमवर ताबा मिळवला असून यामध्ये जुन्या जेरुसलेम शहराचाही समावेश आहे. १९६७ साली झालेल्या युद्धामध्ये इस्रायलने हा प्रदेश ताब्यात घेतला. याच प्रदेशाच्या आजूबाजूला गाझा पट्टीचा भाग आहे. दुसरीकडे पॅलेस्टाइनला या जागा पुन्हा ताब्यात घ्यायच्या आहेत. या ठिकाणांवर ताबा मिळवून हीच पॅलेस्टाइनची राजधानी करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र इस्रायलने या शहराचा पूर्वेकडी भाग हा आपल्या देशासोबत जोडून घेतल्याची घोषणा केली. मात्र याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नाही.