अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला आज तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, या युद्धाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली असली तरी तणावाची परिस्थिती कायम आहे. शांतता कराराच्या चर्चाही सुरू आहेत, पण अद्याप शांतता करार होऊ शकलेला नाही. त्यामुळे सध्या मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद आहेत. अमेरिका-इस्रायल आणि इराण मधील संघर्षाचा फटका जगाला बसत असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी इस्रायली संरक्षण दलाला (IDF) गाझा पट्टीचा ७० टक्के भाग ताब्यात घेण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वेस्ट बँकमधील एका कार्यक्रमात बोलताना बिन्यामिन नेतान्याहू यांनी हे भाष्य केलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इस्रायलने दिलं आहे.
वृत्तानुसार, बिन्यामिन नेतान्याहू यांचा एक व्हिडीओ इस्रायलच्या चॅनल १२ ने प्रसारित केलेल्या फुटेजनुसार, बिन्यामिन नेतान्याहू यांनी दावा केला की, “सध्या इस्रायलचं गाझाच्या सुमारे ६० टक्के भागावर नियंत्रण आहे. आता हे नियंत्रण ७० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. आम्ही सध्या हमासला कोंडीत पकडत आहोत. गाझा पट्टीतील ६० टक्के प्रदेश आमच्या नियंत्रणात आहे. आधी आम्ही ५० टक्क्यांवरच होतो. पण आता ६० टक्क्यांवर पोहोचलो आहोत. माझे निर्देश ७० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आहेत”, असं बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
बिन्यामिन नेतान्याहू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ऑक्टोबर २०२५ मध्ये लागू करण्यात आलेल्या युद्धविरामाबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा इस्रायल-हमास संघर्ष भडकण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, नेतान्याहू यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे कबूल केलं होतं की इस्रायली सैन्याने गाझाच्या सुमारे ६० टक्के भागावर आधीच नियंत्रण मिळवलं आहे. त्यानंतर आता नेतान्याहू यांनी गाझा पट्टीचा ७० टक्के भाग ताब्यात घेण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्यामुळे इस्रायल-हमासमधील तणावात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पॅलेस्टाईनमधील सत्ताधारी हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये मागच्या काही वर्षांत अनेकवेळा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात आतापर्यंत शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
इस्रायल-हमास संघर्ष संपल्याची ट्रम्प यांनी केली होती घोषणा
गेल्या काही वर्षांपासून इस्रायल-हमासमध्ये संघर्ष सुरू होता. हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत शांतता निर्माण व्हावी, यासाठी २० कलमी कार्यक्रम तयार करत हा प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन इस्रायल आणि हमासला ऑक्टोबर २०२५ मध्ये केलं होतं. या युद्धविरामाच्या कराराला इस्रायल आणि हमासने सहमती दर्शवल्यानंतर या कराराचाच एक भाग म्हणून ओलिसांची मुक्तता करण्यात येत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं.
इस्रायल-हमासमधील युद्ध संपलं आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला असता ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “युद्ध संपलं आहे, हे तुम्हाला समजलच असेल.” तसेच इस्रायल-हमासमधील युद्धबंदीचा करार टिकेल असं वाटतं का? यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “मला वाटतं की तो टिकेल. तो टिकण्याची अनेक कारणे आहेत. लोकांना आता त्याचा (युद्धाचा) कंटाळा आला आहे.”
इस्रायल-हमास यांच्यात कधीपासून संघर्ष आहे?
गाझा पट्टीमधील तणावावरून जगभरात चिंतेचं वातावरण असतं. कारण आतापर्यंतच्या इस्रायल-हमास संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अनेक इस्राईली नागरिकांना जीव गमवावा लागला होता. याचबरोबर हमासने शेकडो इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले होतं. त्यानंतर, इस्रायलने गाझा पट्टीत हमासच्या तळांवर हल्ले सुरू केले होते आणि या संघर्षाने तीव्र व हिंसक रूप घेतलं होतं.
गाझा आणि इस्रायलमधील या युद्धामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत अनेक नागरिक अडकले होते. गाझा पट्टीतील नागरिकांना अन्न, पाणी, आणि औषधांच्या तीव्र तुटवड्याचा सामना करावा लागला होता. इस्रायलमधील नागरिक देखील सुरक्षेच्या कारणांमुळे घराबाहेर पडू शकत नव्हते.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलच्या हद्दीत दहशतवादी हल्ले करत १२०० इस्रायलींना ठार केलं होतं. कित्येकांचे अपहरण केलं होतं. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने १३ ऑक्टोबर रोजी सुरू केलेल्या कारवाईनंतर या संघर्षाची व्याप्ती कितीतरी अधिक वाढली होती. सध्या तणावपूर्ण शांतता असली तरी आता पुन्हा एकदा हा संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अशा प्रकारच्या संघर्षाचे जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम होतात.
हमास ही संघटना काय आहे?
‘हरकत अल-मुकावामा उल इस्मानिया’ म्हणजेच ‘हमास’ची स्थापना १९८७ साली गाझा पट्टीत झाली. मुस्लीम ब्रदरहुडची राजकीय शाखा म्हणून पुढे आलेला हा गट. ‘हमास’चा अर्थ इस्लामिक प्रतिकार चळवळ. अरबी भाषेत त्याचा अर्थ ‘उत्साह’ असा होतो. या गटाचे सुमारे ३६५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या गाझा पट्टीवर राजकीय नियंत्रण आहे. सुमारे २३ लाख लोकसंख्या असलेल्या या भागाची इस्रायलने आधीपासून पुरती कोंडी केलेली आहे.
