Benjamin Netanyahu Praises Indian Pilot smit machchhar : दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात बुधवारी थरार घडला. दोन वैमानिकांमध्ये झालेल्या झटापटीत एक वैमानिक जखमी झाला. मात्र, अशाही परिस्थितीत या वैमानिकाने प्रवाशांचे प्राण वाचवले. महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर उड्डाण करणारा हा वैमानिक भारतीय आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुंबईकर आहे. अशा या वैमानिकाचं सर्व स्तरांतून कौतुक होत असताना इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनीही त्यांचं कौतुक केलं. तसंच, या वैमानिकाला मदत करणाऱ्या प्रवाशाला सिंहाची उपमा दिली.
दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या उड्डाणादरम्यान फ्लायदुबईच्या एका वैमानिकाने विमानाचं नियंत्रण मिळवून ते क्रॅश करण्याच्या उद्देशाने आपल्या भारतीय सह-वैमानिकावर चाकूने हल्ला केल्यावर ही घटना घडली. त्यावेळी भारतीय वैमानिक असलेल्या स्मित मच्छार याने शौर्याने प्रवाशांचा जीव वाचवला. कर्तव्यावर असलेल्या क्रू मेंबर्सने विमान सुरक्षित केलं, त्याचा मार्ग बदलला आणि सौदी अरेबियामध्ये सुरक्षितपणे उतरवलं.
“तुम्हीच खरे हिरो”
बिन्यामिन नेतान्याहू म्हणाले, “असाधारण शौर्याबद्दल भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना माझा सलाम. चाकूने हल्ला होऊन गंभीर जखमी झालेले असतानाही त्यांनी लढा दिला, प्रतिकार केला, कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवासी व क्रू मेंबर्सना हल्लेखोराला ताब्यात घेण्यास मदत केली. यामुळे हवेतील एक मोठा भीषण अपघात टळला. त्यांनी इस्रायली नागरिकांसह इतर देशांच्या १७४ लोकांचे प्राण वाचवले. मी कॅप्टन मच्छार यांच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. ते खरे हिरो आहेत.”
“मी एक सिंह पाहत आहे”
दरम्यान, स्मित मच्छार यांना विमानातील इस्रायली प्रवासी यानिव हायून यांनीही मदत केली. रक्ताळलेल्या टीशर्टमध्येच हायून यांनी बिन्यामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. याबाबत बिन्यामिन नेतान्याहू म्हणाले, “मी एक सिंह पाहत आहे, मी एक मोठा हिरो पाहत आहे.” पंतप्रधान नेतन्याहू यांच्या भेटीदरम्यान, हायून यांनी त्यांच्या रक्ताचे डाग असलेल्या शर्टबद्दल इस्रायली नेत्याची माफी मागितली. एका निवेदनात हायूनच्या हवाल्याने म्हटलं आहे की, “मी (माझ्या कपड्यांबद्दल) माफी मागतो, या बैठकीचा आदर राखण्यासाठी कपडे बदलता यावेत म्हणून मी १० वेळा माझी सुटकेस मागितली होती.”
“आपला सिंहांचा देश”
यावर नेतन्याहू यांनी उत्तर दिले, “हाच आदर आहे, तुम्हीच आदरास पात्र आहात, तुम्ही नायक आहात, तुम्ही हे कसं केलं?” त्यावर प्रवाशाने उत्तर दिलं, “आपला सिंहांचा देश आहे, नाही का?” त्यानंतर नेतन्याहू म्हणाले की त्यांना एक मोठा हिरो दिसत आहे आणि शर्टवरील रक्ताच्या डागांकडे बोट दाखवत विचारलं, “वॉव, हे रक्ताचे डाग त्यांचे (सह-वैमानिकाचे) आहेत का?”, यावर प्रवाशाने उत्तर दिलं, “हे त्यांचेच आहे, होय.”
इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी आणि क्रू मेंबर्सनी कॉकपिटमध्ये प्रवेश केला, सह-वैमानिकाला ताब्यात घेतलं आणि विमानात उपस्थित असलेल्या फ्लायदुबईच्या दुसऱ्या दोन वैमानिकांना सौदी अरेबियातील ताबुक येथे विमान सुरक्षितपणे उतरवण्यास मदत केली. इस्रायली नेत्यांनी यापूर्वी या घटनेला “अत्यंत गंभीर सुरक्षा घटना” म्हटलं होतं आणि सौदी अधिकाऱ्यांनी कथित हल्लेखोराला अटक केल्याचं सांगितलं होतं.
