Israel Rejects Trump Peace Plan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’ने घोषित केलेली गाझासाठीची १५ कलमी योजना इस्रायलने फेटाळली आहे. हमासचे पूर्णपणे नि:शस्त्रीकरण होईपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही, असं पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी रविवारी सांगितलं. गेल्या महिन्यात हमासने मंजुरी दिलेल्या योजनेचा उल्लेख करत नेतन्याहू मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाले, “इस्रायल १५ कलमी दस्तऐवज फेटाळत आहे.” इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नि:शस्त्रीकरण होत नाही तोपर्यंत इस्रायली सैन्य माघारी नाही
हमासचे खऱ्या अर्थाने नि:शस्त्रीकरण होत नाही तोपर्यंत इस्रायली सैन्य माघार घेणार नाही आणि आमच्या सैन्याविरुद्ध व नागरिकांविरुद्धचे धोके हाणून पाडणं सुरूच ठेवेल, असंही त्यांनी स्पष्ट केले. नेतन्याहू यांचं हे वक्तव्य गाझा युद्ध संपवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का मानला जात आहे. इस्रायली सैन्य मागे हटण्यापूर्वी हमासने आपली शस्त्रे सोडली पाहिजेत, असा आग्रह इस्रायलने धरला आहे. ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात या संघर्ष निवारण योजनेत मोठं यश मिळवल्याचा दावा केला होता आणि इस्रायल व हमास दोन्ही या आराखड्यावर सहमत असल्याचं म्हटलं होतं.
इस्रायलचे गाझामध्ये हल्ले सुरूच
गेल्या वर्षी सुरू झालेल्या युद्धबंदीनंतर ट्रम्प यांनी असाही दावा केला होता की, ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यापूर्वी जवळपास दोन दशके गाझावर नियंत्रण ठेवणारी हमास संघटना शस्त्रे टाकण्यास तयार झाली आहे. परंतु, गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षरी होऊनही इस्रायलने गाझामध्ये आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. नेतन्याहू यांच्या या नवीन भूमिकेमुळे हमासच्या नि:शस्त्रीकरणाचा मुद्दा ट्रम्प यांच्या गाझा योजनेच्या पुढील टप्प्याच्या केंद्रस्थानी आला आहे. पॅलेस्टिनी लढाऊ संघटनेकडे शस्त्रे असेपर्यंत सैन्य माघारीस इस्रायल कधीही तयार होणार नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे.
इस्रायलचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले नेतन्याहू सध्या सत्तेत टिकून राहण्यासाठी कठीण निवडणुकीच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या मित्रपक्षांनी नवीन मंत्रिमंडळ मतदान घेऊन ही गाझा योजना पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे. यावर नेतन्याहू म्हणाले की, इस्रायल आपल्या आक्षेपांबाबत अमेरिकेशी चर्चा करत आहे. “त्यांच्याकडे काही कल्पना आहेत; त्यातील काही आम्हाला मान्य आहेत आणि काही नाही. अशा बाबींवर आमची भूमिका कशी ठाम ठेवायची हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे”, असं ते म्हणाले.
