Israel Report Hamas Sexual Violence: हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांना अमानवी वागणूक देत लैंगिक अत्याचार आणि मानसिक शारीरिक त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलकडून करण्यात आलेल्या एका स्वतंत्र चौकशीत ही धक्कादायक माहिती उघडकीस आलीय. या चौकशीचा एक अहवाल आता समोर आला असून, यात हमास आणि इतर पॅलेस्टिनी सशस्त्र गटांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा करण्यात आला आहे.
३०० पानांच्या अहवालात धक्कादायक खुलासे
७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यांदरम्यान आणि त्यानंतर रंगलेले ओलीसनाट्य यादरम्यान हमास आणि इतर पॅलेस्टिनी सशस्त्र गटांनी इस्रायली कैद्यांवर केलेल्या अत्याचाराचा धक्कादायक तपशील ३०० पानांच्या अहवालात देण्यात आला आहे. इस्रायली नागरिकांना अधिक वेदना आणि त्रास देण्यासाठी हमासने बलात्कार, लैंगिक छळ आणि अपमानाचा हेतुपुरस्सर वापर केल्याचे अहवालात म्हटले आहे. या अत्याचारातील पीडित, प्रत्यक्षदर्शी आणि ओलीस असणाऱ्या जवळपास ४३० जणांच्या मुलाखती घेऊन माहिती प्रकाशित केल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.
लैंगिक अत्याचार
याशिवाय हल्लेखोरांनी स्वत:च काढलेले फोटो, व्हिडीओ यांची देखील या अहवालासाठी मदत घेण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. जवळपास १० हजार फोटो आणि व्हिडीओ मिळाल्याचा दावा केला जात आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा शोध घेण्यासाठी ही स्वतंत्र चौकशी इस्रायलकडून करण्यात आली होती. हमास- इस्रायल तणावाच्या काळात जवळपास १,२०० नागरिकांचा मृत्यू झाला होता तर, २५१ जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. चौकशी अहवालानुसार, हमासने जिंवत आणि मृत महिलांबरोबर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
कौटुंबिक रचना उद्ध्वस्त करण्याचा उद्देश
प्रत्यक्षदर्शींकडून बलात्काराच्या घटना आणि छळाची माहिती देण्यात आली. कैद्यांवर दीर्घकाळ मानसिक आघात व्हावा यासाठी सक्तीचे लग्न करण्यासाठी धमकी देण्यात आली एवढेच नव्हे तर नातेवाईकांना एकमेकांवर लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडले, असे या अहवालात म्हटले आहे. यामागे कौटुंबिक रचना उद्ध्वस्त करण्याचा उद्देश होता असेही सांगितले जात आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या अनुभवानुसार, एका महिलेला गाडीतून बाहेर ओढत अंगावरील कपडे फाडली तसेच जबरदस्तीने बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. मृत्यू झाल्यानंतरही त्यांनी महिलेवर बलात्कार केल्याचे अहवालात म्हटले आहे.
मानसिक आघातासाठी अत्याचार
गाझा सीमेजवळ नोव्हा संगीत कार्यक्रमात झालेल्या हल्ल्यात ३७० जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याठिकाणी देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. महिला आणि पुरुष दोघेही या अत्याचारांना बळी पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, लैंगिक अत्याचार हा त्यांच्या दीर्घकाळ आघात करण्याच्या धोरणाचा एक भागच होता, असे मत अहवालात मांडण्यात आले आहे.
