इस्रायलच्या सेनेने हा दावा केला आहे की अयातुल्ला अली खामेनी यांनी वापरलेलं विमान नष्ट केलं आहे. रॉयटर्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे. इस्रायलच्या सेनेने हे सांगितलं की रविवारी रात्री त्यांनी मेहराबाद विमानतळावर असलेलं खामेनी यांनी वापरलेलं विमान उद्ध्वस्त केलं. इस्रायलच्या सैन्याने हा दावाही केला आहे की या विमानाचा उपयोग इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्कराशी संबंधित अधिकाऱ्यांनीही वापरलं होतं आम्ही ते नष्ट केलं.
२८ फेब्रुवारीला अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू
२८ फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा घराला लक्ष्य केलं. त्यांच्या घरावर क्षेपणास्त्र डागण्यात आली. या हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आता इस्रायलने अयातुल्ला अली खामेनी वापरत होते ते विमानही नष्ट केल्याचा दावा केला आहे. तिन्ही देशांमध्ये युद्ध सुरु झालं आहे. या युद्धाला १७ दिवस झाले आहेत. या युद्धाचा परिणाम जगातल्या देशांवर होतो आहे. कारण हे देश इराणवर इंधनासाठी अवलंबून आहेत. या युद्धानंतर भारतात एलपीजीचा तुटवडा जाणवतो आहे.
इस्रायलच्या भारतातील राजदुतांनी काय म्हटलं आहे?
भारतातले इस्रायलचे राजदूत रुवेन अजार म्हणाले की इराणने जर त्यांचं धोरण बदललं तर आम्ही युद्ध संपवण्यासाठी तयार आहोत. इराण अडचणीत आहे, त्यांनी आमच्याशी तडजोड केली तर आम्ही युद्ध संपवू. इराणला संघर्ष परवडणारा नाही. त्यांची अवस्था वाईट आणि बिकट आहे. त्यांनी आमच्याशी तडजोड केली तर त्यांचं भवितव्य उज्ज्वल असू शकतं. पण संघर्षच करत राहिले तर त्यांना येत्या काही दिवसामध्ये कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल.
