इस्रायलच्या सैनिकाने दक्षिण लेबनॉनमध्ये लष्करी कारवाईदरम्यान येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. या कृत्याचा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी निषेध केला आहे. हे कृत्य इस्रायली सैन्याच्या मूल्यांविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून या घटनेने वेदना झाल्याचेही ते म्हणाले.
हा सैनिक पुतळ्याची विटंबना करताना हातोड्याचा वापरत करत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित होताच सर्वत्र निंदा होत होती. हे छायाचित्र खरे असल्याचे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे. गाझामध्येही ज्यांनी प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली, त्यांना असे लाजिरवाणे कृत्य करून त्याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यास काहीही वाटणार नाही अशी टीका इस्रायलच्या क्नेसेटमधील पॅलेस्टिनी सदस्य अहमद टिबी यांनी केली आहे. लेबनॉनमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून इस्रायल आणि हेझबोला यांच्यात युद्धविराम सुरू झाला.
इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘आयडीएफ’ने या प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. इस्रायली सैनिकांच्या मूल्यांशी विपरीत असे हे कृत्य आहे. संरक्षण दलांतील विविध स्तरांवर याची सध्या चौकशी सुरू आहे. यामध्ये सहभागी सर्वांवर योग्य ती कारवाई केली जाईल. हा पुतळा संबंधित ठिकाणी पुन्हा बसविला जाईल.
त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. दक्षिण लेबनॉनमध्ये ‘आयडीएफ’ हेझबोलाने तयार केलेले दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी तैनात आहे. येथील नागरी पायाभूत सुविधांना, प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्याचा कुठलाही हेतू नाही, असे स्पष्ट केले आहे.
