Israel has launched targeted strikes on several Iranian oil storage facilities and depots : इस्रायलने इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शनिवारी इराणच्या अनेक तेल डेपोंवर हल्ले केले. परिणाीम तेहरान आणि शेजारील कारज शहर स्फोटांमुळे हादरले होते. यामुळे आकाशात आगीचे आणि धुराचे मोठे लोळ उठले होते.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये हल्ल्याच्या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात ज्वाळांचे लोळ उठताना दिसत आहेत. गेल्या आठवड्याभरात अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले. या हल्ल्यांमधअये तेहरान आणि अल्बोर्झ प्रांतातील अनेक तेल साठवणूक डेपोंना लक्ष्य करण्यात आलं होतं.

तेहरानच्या पश्चिमेला असलेल्या कारजमधील एका डेपोवरही हा हल्ला झाला. तेहरानचा मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्प शहर रे जिल्ह्याजवळ आहे. यावरही हल्ला करण्यात आला होता. वायव्य तेहरानमझील शहरान तेल डेपो वर गेल्या जून महिन्यात हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. यामुळे आगीची धग अद्यापही कमी झालेली नाही.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हल्ला

इराणच्या तेल मंत्रालयाने सांगितलं की अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचारी आग विझवण्यासाठी काम करत आहेत. या हल्ल्यांमुळे इंधन किंवा ऊर्जेचा तुटवडा निर्माण होणार नाही, यावरही त्यांनी भर दिला. टाइम्स ऑफ इस्रायलला दिलेल्या माहितीत, इराणी तेल मंत्रालयाच्या एका सूत्राने पुष्टी केली की पश्चिम तेहरानमधील कुहक आणि शहरान भागातील तीन डेपो तसंच कारजमधील सुविधांवर इस्रायली लढाऊ विमानांनी हल्ला केला.

इस्रायली लष्कराने हल्ल्यांना दुजोरा देत म्हटलं की इंधन साठवणूक आणि ऊर्जा संकुलांचा वापर इराणच्या सशस्त्र दलांकडून केला जात होता. त्यामुळे इस्रायलकडून हा हल्ला महत्त्वाचा हल्ला म्हटलं जात आहे.