इराणने जो दहा कलमी कार्यक्रम दिला त्यानंतर अमेरिकेने इराणशी सुरु असलेल्या युद्धादरम्यान दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर केली. दरम्यान इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्त कारवाई करत हे युद्ध सुरु केलं होतं. इस्रायलने आता अमेरिकेने आम्हाला अंधारात ठेवून शस्त्रसंधी जाहीर केल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. इराणशी जी चर्चा अमेरिकेने केली त्यातून आम्हाला बाजूला ठेवण्यात आलं असंही इस्रायलने म्हटलं आहे. त्यामुळे आता हा संघर्ष पुन्हा पेटणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
इस्रायलची तीव्र नाराजी
इराण आणि अमेरिका यांच्यात साधारण ९० मिनिटांची चर्चा झाली ज्यानंतर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली. ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर करताना इस्रायलकडूनही हल्ले थांबवले जातील, असे म्हटले होते. इस्रायलने तरीदेखील लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवून शस्त्रसंधीमध्ये खोडा घातला. आता तर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी या शस्त्रसंधीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इस्रायलने या निर्णयाचं समर्थन केलं होतं. पण या निर्णयला २४ तासही उलटत नाहीत तोच इस्रायलने नाराजी व्यक्त केली आहे आणि अमेरिकेने अंधारात ठेवल्याचा आरोप केला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी काय म्हटलंय?
“मी हे स्पष्ट करु इच्छितो की आमची काही टार्गेट्स बाकी आहेत. आम्ही ती पूर्ण करणारच आहोत. तडजोडीने किंवा युद्ध करुन ते बघता येईल.अमेरिकेने इराणला कमकुवत केलं आहे. शस्त्रसंधी झाली आहे, पण इराण आता पूर्णपणे कमकुवत झाला आहे.” असं विधान नेतान्याहू यांनी केलं आहे. नेतान्याहू यांनी हे विधान केल्याने आता संघर्ष आणखी चिघळणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. शस्त्रसंधीच्या घोषणेला २४ तास पूर्ण होण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आता याचा परिणाम कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
लेबनॉनवर इस्रायलने कुठलीही पूर्वसूचना न देता केले हल्ले
शस्त्रसंधी जाहीर झाल्यामुळे लेबनॉनच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकला नाही. इस्रायलने बुधवारी दुपारी कोणतीही पूर्वसूचना न देता, मध्य बेरुतमधील वर्दळ असलेल्या अनेक व्यावसायिक आणि निवासी भागांमध्ये हवाई हल्ले केले. या लेबनॉनवरील सर्वात मोठ्या हल्ल्यात किमान ११२ जण ठार झाले आणि अन्य शेकडो जखमी झाले. त्याशिवाय इस्रायलने लेबनॉनच्या अन्य भागांमध्येही हल्ले केले. दिवसभरात संपूर्ण देशात २५४ जण ठार झाल्याची माहिती लेबनॉनच्या नागरी संरक्षण विभागाने दिली. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे विस्थापित झालेल्या लोकांनी जिथे आश्रय घेतला आहे, त्याच भागाला इस्रायलने लक्ष्य केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
