इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. दरम्यान, इराणने दुबईसह अनेक देशांवर हल्ले केल्यानंतर जगभरातील प्रवाशांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. हल्ल्यानंतर अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली होती. यामुळे दुबईला फिरण्यासाठी गेलेले अनेक प्रवासी तेथे अडकून पडले होते. अशा परिस्थितीत सोमवारी रात्री सुमारे दोन वाजता दुबईहून एक विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं. प्रवाशांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत.
हर्षिल चोराडिया या प्रवाशाने काय सांगितलं?
हर्षिल नावाच्या प्रवाशाने सांगितलं की आम्ही मिसाईलचा आवाज आम्ही ऐकला, दुबई शहरातलं वातावरण चांगलं होतं. आम्हाला अलर्ट मिळत होते. एअर स्पेस बंद होती त्यामुळे कुठल्याही पर्यटकाला परतता येत नव्हतं. आता आम्ही व्हाया ओमान, मस्कतहून मुंबईत परतलो आहोत. इराणने अबूधाबीच्या अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केला. ५०० मिसाईल हल्ले झाले असं आम्हाला समजलं. सामान्य लोकांना काही त्रास व्हायला नको यासाठी त्यांनी काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. पण माझ्यासारखे अनेक भारतीय पर्यटक किंवा बिझनेस टूरसाठी गेलेले लोक तिथे आहेत. त्यांना सोडवून आणण्यासाठी आपल्या सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं हर्षिल चोरडिया या पर्यटकाने सांगितलं.
दुबईतून परतलेल्या महिलेने काय सांगितलं?
दुबईत लोकांना भीती वाटते आहे, तसं होणं साहजिक आहे. ओमानी लोकांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. ते पूर्णपणे सहकार्य करत आहेत. आता घरी परतल्यावर मला हायसं वाटतं आहे असं एका महिलेने ANI ला सांगितलं. अमित नावाच्या प्रवाशाने सांगितलं मिसाईलचा आवाज आम्हाला ऐकू होत होता. पण दुबई शहर सुरु होतं. आम्हाला थोडी काळजी वाटत होती. पण हळू हळू वातावरण निवळलं. शनिवारी थोडी भीती वाटली होती. पण आता मुंबईत परतल्यावर मला बरं वाटतं आहे.
दुबईतून परतलेल्या आणखी एका प्रवाशाने काय सांगितलं?
आणखीएका पर्यटकाने सांगितलं की ड्रोन हल्ले होत होते. त्याचे आवाज येत होते. त्या आवाजांमुळे भीतीचं वातावरण होतं. कारण अनेक लोकांसाठी असा हा पहिलाच अनुभव होता. अनेकांना वाटत होतं की मिसाईल हल्ला झाला. डेब्रिस पडल्यावर लोक घाबरत होते. भारताने जसं ऑपरेशन सिंदूर राबवलं तशाच प्रकारचं युद्ध तिथे सुरु आहे. स्थानिकांमध्ये जास्त दहशत पाहण्यास मिळाली.
अजय नावाच्या प्रवाशाने काय सांगितलं?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अजय नावाच्या एका प्रवाशाने माध्यमांशी संवाद साधला. अजय यांनी सांगितले की, आम्ही मुंबईहून हैदराबाद आणि तेथून दुबईला पोहोचलो होतो. दुबईहून आमची पुढील फ्लाइट अमेरिकेसाठी होती. आम्ही सर्वजण विमानात बसलोही होतो. त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा विमानाने उड्डाण घेतले नाही तेव्हा चौकशी करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे ८ तास निघून गेले. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सध्या उड्डाण करता येणार नाही. अजय यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर विमानतळावर मोठी धावपळ उडाली. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर एमिरेट्सच्या बसेस आणि गाड्या विमानतळावर आल्या आणि आम्हाला हॉटेलपर्यंत सोडण्यात आले. मात्र त्यानंतरही आम्ही संपूर्ण रात्र हॉटेलच्या शोधात भटकत राहिलो. १० ते १२ तास भटकल्यानंतर आम्हाला एक हॉटेल मिळाले. या दरम्यान आम्ही बॉम्बस्फोटांचे आवाजही ऐकले. तसेच बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोटही पाहिले.
