Israeli military warned to Iranian People : इराणविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून मंगळवार रात्रीपर्यंत अमेरिका मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या मागणीसाठी अमेरिकेने सातत्याने पाठपुरावा करूनही इराणने अमेरिकेच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्यावरून अमेरिका आता कोणताही मार्ग अवलंबू शकते. अशा या स्थितीत इस्रायलने इराणच्या नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. येत्या १२ तासांत इराणी नागरिकांनी ट्रेनने प्रवास करण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी एक्सवरील त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरून फारीस भाषेत जारी केलेल्या इशाऱ्यात नागरिकांना रेल्वे वाहतुकीचा वापर टाळण्यास सांगण्यात आले आहे.

इस्रायल लष्कराने नेमकं काय म्हटलंय?

“तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही नम्रपणे विनंती करतो की या क्षणापासून इराण वेळेनुसार ११ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११ वाजेपर्यंत) तुम्ही संपूर्ण इराणमध्ये रेल्वेचा वापर आणि प्रवास करणं टाळावं”, असं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. “ट्रेनमध्ये आणि रेल्वे मार्गांजवळ तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो”, असं त्यांनी सूचित केलं आहे.

इस्रायल लष्कराने केलेली पोस्ट

या सूचनेत कोणत्याही विशिष्ट प्रदेशाचा किंवा रेल्वे मार्गांचा उल्लेख नसल्यामुळे धोक्याच्या नेमक्या स्वरुपाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. या इशाऱ्यावर इराणी अधिकाऱ्यांकडून तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिकेचा इराणविरोधात मोठा प्लान

इस्लामिक राष्ट्र असलेल्या इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली न केल्यास आणि मंगळवारपर्यंत युद्धविराम करारावर चर्चा न केल्यास, इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी तेहरानला अण्वस्त्रे सोडून देण्यास आणि तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, “संपूर्ण देश एका रात्रीत नष्ट केला जाऊ शकतो आणि ती रात्र मंगळवारची असू शकते. मला आशा आहे की मला असे पाऊल उचलावे लागणार नाही.” पत्रकारांनी विचारले की इराणच्या नागरी वीज प्रकल्पांवर हल्ला करणे हा ‘युद्ध गुन्ह्या’चा (War Crime) भाग ठरेल का, तेव्हा ट्रम्प यांनी तो दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, “मला त्याची काळजी नाही. तुम्हाला माहित आहे युद्ध गुन्हा काय असतो? अण्वस्त्र बाळगणे हा युद्ध गुन्हा आहे.”