इस्रायलने गाझा पट्टीवरील लष्करी हल्ले पाचव्या दिवशीही कायम ठेवल्याने मृतांचा आकडा १३५ वर पोहोचला आहे. पॅलेस्टिनचे रॉकेट आक्रमण परतवून लावण्यासाठी ज्यू नेतृत्वाने संरक्षण मोहीम हाती घेतली आहे. सैन्याने शनिवारी केलेल्या हल्ल्यात ३० पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले आहेत.
नवीन हल्ल्यात ६० हून अधिक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. याच वेळी इस्रायलमधील बीरशेबा भागात पॅलेस्टिनींनी डागलेली दोन रॉकेट्स येऊन आदळली. इस्रायलला पॅलेस्टिनमधील दहशतवादी तळ तसेच ते चालवणाऱ्यांच्या घरांवर हल्ले करायचे आहेत. शनिवारच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये डझनहून अधिक दहशतवादी असल्याचा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. संघर्ष थांबवा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले असले तरी उभय नेत्यांमध्ये शस्त्रसंधी झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
इस्रायली शहरांतील सुव्यवस्था कायम राखणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हमासला शांती नको असेल तर ती आम्हालाही नको आहे.
बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलचे पंतप्रधान