इस्रायलचा हल्ला; गाझात ४२ जण ठार

गाझा शहरात रविवारी इस्रायली लढाऊ विमानांनी अनेक इमारतींवर हल्ले केले.

गाझा शहर : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात रविवारी गाझामध्ये ४२ जण ठार झाले असून तीन इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. याशिवाय या हल्ल्यांमध्ये इतर पन्नास जण जखमी झाले आहेत.

गाझातील प्रमुख हमास नेत्याच्या घरावर  इस्रायली सैन्याने हल्ला केला असून गेला आठवडाभर  इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात धुमश्चक्री चालू आहे. हमासने मोठय़ा प्रमाणात इस्त्रायलवर अग्निबाणांचा मारा केला. आयसिसच्या ताब्यातील भागातून हमास हल्ले करीत आहे.

ब्रिगेडियर जनरल हिदाई झिबेरमान यांनी इस्रायली रेडिओला सांगितले, की लष्कराने हमासचे वरिष्ठ नेते येहीय सिनवर यांच्या घरावर हल्ला केला. सध्या झिबेरमान हे या गटाच्या एका छावणीत लपून बसले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दक्षिण गाझा येथील खान युनूस शहरात त्यांचे घर असून लष्कराने म्हटले आहे, की सिनवर यांच्या भावाच्या घरावरही हल्ला करण्यात आला. ते  दोघेही एकाच घरात राहत असावेत असा अंदाज आहे. हमास व इस्लामिक जिहादी दहशतवादी गटाने त्यांचे वीस जण सोमवारपासून मारले गेल्याचे मान्य केले आहे. इस्रायलने म्हटले आहे, की मारल्या गेलेल्यांची संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

गाझा शहरात रविवारी इस्रायली लढाऊ विमानांनी अनेक इमारतींवर हल्ले केले. त्याची छायाचित्रे पत्रकार व नागरिकांनी प्रसारित केली आहेत. एका रस्त्यावर बॉम्बहल्लय़ामुळे मोठा खड्डा पडला असून हा रस्ता शिफा रुग्णालयाकडे जाणारा आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की या हल्लय़ात दोन ठार व २५ जण जखमी झाले असून त्यात स्त्रिया व मुले यांचा समावेश आहे. शनिवारी इस्रायलने हमासच्या राजकीय शाखेचा प्रमुख नेता खलिल अल हयेह याच्या घरावर हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला की नाही हे समजले नाही, पण त्याच्या घरातून दहशतवाद्यांना रसद पुरवठा होत होता.

२०१४ नंतरचे सर्वात मोठे युद्ध

इस्रायलने शेकडो हवाई हल्ले केले असून त्या भागात काही ठिकाणी अडथळे निर्माण केले आहेत. दी असोसिएटेड प्रेसचे गाझा येथील कार्यालय असलेली इमारतही या हल्लय़ात पाडली गेली आहे. २०१४ मधील गाझा युद्धानंतर हे सर्वात मोठे युद्ध असून आतापर्यंत गाझात १४५ पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, त्यात ४१ मुले व २३ महिलांचा समावेश आहे. आठ इस्रायली हल्लय़ात मारले गेले असून त्यात एक पाच वर्षांचा मुलगा व एका सैनिकाचा समावेश आहे.

इस्रायलवर २००० अग्निबाणांचा मारा

हमास व इतर दहशतवादी गटांनी गेल्या सोमवारपासून इस्रायलवर दोन हजार अग्निबाणांचा मारा केला आहे. जेरुसलेम या पवित्र स्थळावरून वाद सुरू असून पॅलेस्टिनी कुटुंबांना बाहेर काढण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Israeli air strikes killed 42 in gaza zws

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका