Israeli strikes kill 89, wound 700 in Lebanon: इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ८९ नागरिक ठार झाले असून, ७०० लोक जखमी झाले आहेत. इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये विविध ठिकाणी भीषण हल्ले केले यात अनेकांचा मृत्यू झाला. दक्षिण लेबनॉनमध्ये मृत झालेल्यांमध्ये १२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश, अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने रॉयटर्सला दिली आहे.
लेबनॉनमध्ये सर्वत्र हल्ले
इस्रायलने लेबनॉनमध्ये सर्वत्र हवाई हल्ले केले असून, यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इमारती कोसळल्या असून, अनेक रहिवासी भागात हाहाकार माजला आहे. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून हल्ले झालेल्या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. इस्रायलने मात्र, लेबनॉनमधील १०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. ही हिजबुल्लाहची कमांड सेंटर्स आणि लष्करी ठिकाणे असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
लेबनॉनबरोबर शस्त्रसंधी नाहीच!
बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने बीरूतच्या दक्षिणेकडील उपनगरे, दक्षिण लेबनॉन आणि पूर्व बेका खोऱ्यात हल्ले केले आहेत. इराणसोबत झालेल्या शस्त्रसंधी लेबनॉनचा देखील समावेश असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. पण, नेतान्याहू यांच्या कार्यालयाने हा दावा फेटाळल्यानंतर काही तासांतच लेबनॉनवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, अद्याप नेमका आकडा समोर आलेला नाही.
इराणबरोबर शस्त्रसंधीनंतर लेबनॉनवर हल्ले तीव्र
इस्रायली हल्ल्यांच्या भीतीमुळे लेबनॉनमधील १२ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. यातील बहुतेक लोक दक्षिणेकडील, पूर्व बेका खोऱ्यातील आणि बीरूतच्या दक्षिण उपनगरांतील शिया मुस्लिम समुदायांमधील आहेत, असे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या भागांमध्ये हिजबुल्लाहचा प्रभाव असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सीमेलगतचे अनेक गावे इस्रायलकडून नष्ट करण्यात आली आहेत. हिजबुल्लाहचे तशळ उदध्वस्त करण्यासाठी इस्रायली सैन्य या भागात बफर झोन तयार करत असल्याचे सांगितले जाते. इराणबरोबर शस्त्रसंधीला सकारात्मकता दर्शवणाऱ्या इस्रायलने लेबनॉनवर हल्ले वाढवल्याने आता येथील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आत्तापर्यंत १,५०० ठार
हिजबुल्लाहने इराणच्या समर्थनार्थ इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले होते. यानंतर इस्रायलने लेबनॉनवर हवाई आणि जमिनीवरुन हल्ले करण्यास सुरुवात केली. २ मार्च पासून सुरु केलेल्या या हल्ल्यांमध्ये १३० हून अधिक मुले आणि १०० हून अधिक महिलांसह १५०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. या संघर्षामुळे १२ लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत, अशी माहिती बीबीसीच्या वृत्तात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
