Israeli vs Lebanon Air Strike on Hezbollah : गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये (पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना) चालू असलेल्या युद्धात लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हेझबोलाने उडी घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलचं लष्कर आणि हेझबोलामध्ये युद्ध चालू आहे. दरम्यान, इस्रायली वायूदलाने हेझबोलावर मोठा हल्ला केला आहे. त्यांनी सोमवारी (२३ सप्टेंबर) रात्री लेबनॉनमध्ये एअर स्ट्राइक केला असून या हल्ल्यात ४९२ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये ३५ मुलं आणि ५८ महिलांचा समावेश आहे. तसेच तब्बल १६४५ लोक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. इस्रायलची लढाऊ विमानं अजूनही ठराविक वेळाने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले करत आहेत. दुसऱ्या बाजूला इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये घुसून हल्ला करू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी जमिनीवरून प्रत्यक्ष हल्ल्याच्या शक्यता नाकारल्या आहेत.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांना विचारण्यात आलं की, “तुमचं सैन्य जमिनीवरून हल्ला करण्यास सज्ज आहे का? तुमचं उत्तर ‘हो’ असं असेल तर किती वेळात तुमचं सैन्य लेबनॉनमध्ये शिरेल?” यावर उत्तर देताना हगारी म्हणाले, “होय! आमचं सैन्य कोणत्याही वेळी हल्ल्यासाठी सज्ज आहे. आम्ही आमच्या सर्व नागरिकांना उत्तर इस्रायलमध्ये सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू”. इस्रायल डिफेन्स फोर्सचे प्रमुख हार्जी हालेवी सोमवारी (२३ सप्टेंबर) म्हणाले होते की “आमचं सैन्य त्यांना दिलेलं लक्ष्य साध्य करत आहेत. आता आम्ही पुढील टप्प्यांची तयारी करत आहोत. लवकरच त्याबाबतचा तपशील जाहीर केला जाईल”.

हे ही वाचा >> उत्तर प्रदेशात पुन्हा रेल्वेचा अपघात घडवण्याचा प्रयत्न; कानपूरजवळ रेल्वे रुळावर आढळले गॅस सिलिंडर; एका महिन्यातली पाचवी घटना

इस्रायलचं सैन्य सीमेवरून लेबनॉनमध्ये शिरणार?

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी लेबनॉनला लागून असलेल्या इस्रायलच्या सीमवर्ती भागातील लोकांना घरं रिकामी करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे इस्रायली लष्कर जमिनी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा चालू आहे.

हे ही वाचा >> पेजर स्फोटप्रकरणी केरळमध्ये तपास; नॉर्वेस्थित रिन्सन जोस याच्या कुटुंबीयांची चौकशी

हमास व हेझबोलाच्या दोन कमांडर्सवर हवाई हल्ला

दरम्यान, इस्रायली संरक्षण दलातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं की बैरुतमध्ये हेझबोलाच्या दक्षिण आघाडीचा कमांडर अली कराकी याच्या तळावर हवाई हल्ला करण्यात आला. त्यानंतर हेझबोलाने पुष्टी केली आहे की त्या एअर स्ट्राइकमधून कराकी बचावला आहे. कराकी हा हेझबोलाचा प्रमुख हसन नसराल्लाह याच्यानंतरचा दुसरा सर्वात वरिष्ठ कमांडर आहे. दुसऱ्या बाजूला इस्रायली लष्कर हमासशी देखील दोन हात करत आहे. इस्रायली वायू दलाने शुक्रवारी हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम अकील याला ठार मारलं. तो देखील कराकी याच्या दर्जाचा कमांडर होता. स्काय न्यूजने लेबनीज अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अकीलच्या मृत्यूचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कराकी जिवंत आहे की हवाई हल्ल्यात मारला गेला याबाबत प्रश्न विचारल्यानंतर इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे याबाबतची अधिकृत माहिती नाही.

Story img Loader